शेतीच्या वादात नातवाने केला आजोबाचा खून
By Admin | Updated: July 10, 2016 01:40 IST2016-07-10T01:40:50+5:302016-07-10T01:40:50+5:30
शेतीच्या वादातून तरुण नातवाने वृद्ध आजोबाचा खलबत्त्याने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस

शेतीच्या वादात नातवाने केला आजोबाचा खून
यवतमाळ : शेतीच्या वादातून तरुण नातवाने वृद्ध आजोबाचा खलबत्त्याने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कीटा गावात घडली.
शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची फिर्याद शनिवारी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. मारोती केजा घोटेकर (७०) रा. किटा असे मृताचे नाव आहे. त्यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून शेतीचा वाद होता. या वादातून शुक्रवारी घरात भांडण झाले. या भांडणातच १८ वर्षीय अजय वसंत घोटेकर या नातवाने मारोती यांना खलबत्त्याने मारुन गंभीर जखमी केले. मारोती यांना तेथून मुलीच्या घरी मार्तंडा येथे जखमी अवस्थेत नेण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अजयविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ठाणेदार संजय डहाके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनुप वाकडे, जमादार राजकुमार आडे तपास करीत आहे.
महानिरीक्षकांचे डिटेक्शनचे आदेश
यवतमाळ : यवतमाळसह पाच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक शनिवारी अमरावतीत पार पडली. त्यात विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी गुन्हेगारीचा आढावा घेतला.
यवतमाळातील प्रॉपर्टी व शरीरासंबंधीच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत महानिरीक्षकांनी चिंता व्यक्त करताना डिटेक्शनचे तसेच न्यायालयीन खटल्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले. कायदा व सुव्यवस्था, पोलीस व समाजातील समन्वय यावरही भर देण्याच्या सूचना विठ्ठल जाधव यांनी दिल्या.