आंघोळीला गेलेल्या आजोबा-नातवाचा तलावात बुडून मृत्यू
By Admin | Updated: May 6, 2015 01:49 IST2015-05-06T01:49:02+5:302015-05-06T01:49:02+5:30
गावाशेजारच्या तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या आजोबा आणि नातवाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना

आंघोळीला गेलेल्या आजोबा-नातवाचा तलावात बुडून मृत्यू
पुसद : गावाशेजारच्या तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या आजोबा आणि नातवाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुसद तालुक्यातील सावरगाव बंगला येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. आंघोळ करणाऱ्या बुडणाऱ्या नातवाला वाचविताना आजोबांचाही मृत्यू झाला.
सोमला लालू राठोड (७०) आणि पिंटू सुरेश राठोड (१०) रा. सावरगाव बंगला असे मृत आजोबा आणि नातवाचे नाव आहे. सोमला राठोड यांचा गुरे चारण्याचा व्यवसाय आहे. दररोज ते गुरांना पाणी पाजण्यासाठी गावानजीकच्या तलावावर घेऊन जातात. तेथेच आंघोळही करतात. मंगळवारी त्यांच्यासोबत त्यांचा नातू पिंटूही आला. दुपारी ३ वाजता आंघोळ करीत असताना पिंटू तलावाच्या खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी आजोबा सोमला राठोड धावले. मात्र तलावात गाळ असल्याने दोघेही गाळात रुतले. हा प्रकार पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलांना दिसला. त्यांनी आरडाओरड केली असता संपूर्ण गाव तलावावर गोळा झाला. या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. या दोघांचे मृतदेहच बाहेर काढावे लागले.
सात वर्षापूर्वी याच तलावात गावातील किसन राठोड या इसमाचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)