ग्रामसेवकांनी जपली सामाजिक बांधिलकी
By Admin | Updated: November 7, 2015 02:41 IST2015-11-07T02:41:39+5:302015-11-07T02:41:39+5:30
आदिवासीबहुल झरी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने आजाराने बाधीत असलेल्या बाल रूग्णाला मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

ग्रामसेवकांनी जपली सामाजिक बांधिलकी
मुकुटबन : आदिवासीबहुल झरी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने आजाराने बाधीत असलेल्या बाल रूग्णाला मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
झरी तालुक्यातील बोपापूर येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा हर्षल मारोती पायघन जपानी मेंदूज्वराने आजारी आहे. त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. हर्षल सध्या नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. त्यासाठीही त्याला काहींनी मदत केली. याबाबत येथील ग्रामसेवकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संघटनेसमोर हा विषय मांडला. संघटनेने लगेच बालरूग्णाला मदत करण्याचा निर्णय घेतला. संघटनेने सदस्यांकडून त्यासाठी निधी गोळा केला. तब्बल १० हजार ५०० रूपये गोळा झाले. ही मदत लगेच हर्षलच्या पालकांना सोपविण्यात आली. यातून ग्रामसेवक संघटनेने समाजापुढे आदर्श ठेवला. याशिवाय आणखी मदत करून इच्छिणाऱ्यांनी बालकाला मदत द्यावी, असे आवाहन संघटनेने केले. ग्रामसेवक संघटनेचे कापसे, ढोले, टाले, यनगंटीवार, किनाके, विजय उईके, ग्रामविकास अधिकारी, स्मिता काळे व ग्रामसेवकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. (शहर प्रतिनिधी)
कुटुंबीयांकडून विद्यार्थ्याला मदतीचे आवाहन
दुसरीतील सात वर्षीय विद्यार्थी हर्षद पायघन सध्या सावंगी मेघे यथे उपचारार्थ दाखल आहे. तो अत्यंत गरिब कुटुंबातील असल्यामुळे त्याच्या उपचाराकरिता कुटुंबियांनी मदतीचे आवाहन केले आहे. हर्षदला जपानी मेंदूज्वर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्यावर नऊ आठवडे उपचार चालणार आहेत. मोठ्या खर्चाच्या उपचारासाठी कुटुंबीयांची ऐपत नसल्यामुळे सध्या तो इलाजाविनाच आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेत जपानी मेंदूज्वर रोगाचा समावेश नसल्याने त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे हर्षदच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी हर्षदला उपचाराकरिता आर्थिक मदत करावी, असे आवाहन झरीचे गटविकास अधिकारी मेघावत यांनी केले आहे. झरी पंचायत समिती कार्यालयातर्फे हर्षदला ३९ हजार १४० रूपयांचा मदत निधी गुरूवारी देण्यात आला. हर्षदच्या वडिलांचे बँक खाते एसबीआय बँकेत असून खाते क्रमांक ३२७४५९०४०६९ आहे. मदतकर्त्यांनी या खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.