आठ गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाला इमारतच नाही
By Admin | Updated: May 2, 2015 02:01 IST2015-05-02T02:01:46+5:302015-05-02T02:01:46+5:30
तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अशा आहेत आहे की ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नाही.

आठ गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाला इमारतच नाही
आर्णी : तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अशा आहेत आहे की ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांच्या घरून किंवा इतर ठिकाणाहून चालतो. त्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत.
ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्यामुळे विकास कामांना मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी अथवा एखाद्या दाखल्यासाठी भटकावे लागत आहे. या गावांमध्ये बारभाई, बोरगाव (पु), अंजनखेड, घोन्सरा, खंडाळा, माळेगाव, तेंडोळी, अंजनखेड, वरूड (म) आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी राजीव गांधी भवन अंतर्गत काम घेतल्या गेले आहे. परंतु अद्याप बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे वास्तव दिसून येते.
गावातील सर्व कामे ग्रामपंचायत अंतर्गत केली जात आहे. इतरही विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असणे सोयीचे ठरते. तेथून लोकांशी संपर्क साधणे सोपे जाते. त्यामुळे कामालाही गती येते.
परंतु इमारतच नसल्यामुळे सर्वच कामे खोळंबतात. अनेक ग्रामपंचायतींना संगणक संच दिला गेला आहे. त्यासाठी एका आॅपरेटरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींचे स्वतंत्र कार्यालयच नसल्यामुळे संगणक धूळ खात पडले आहे किंवा सरपंचांच्या घरी ठेवण्यात आले आहे.
परंतु या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारीसुद्धा या बाबत उदासीन दिसून येतात. काही दिवसांपूर्वी आर्णी पंचायत समिती सदस्य सारनाथ खडसे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बाबत माहिती देऊन आपण स्वत: याकडे लक्ष द्यावे, असे निवेदनही दिले होते. परंतु त्यानंतरही या बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही. (शहर प्रतिनिधी)