ग्रामपंचायत सदस्याची डॉक्टरला मारहाण
By Admin | Updated: October 30, 2016 00:15 IST2016-10-30T00:15:53+5:302016-10-30T00:15:53+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल भावसार यांना ग्रामपंचायत सदस्य शे. सलीम शे. नवाज यांनी मारहाण केली.

ग्रामपंचायत सदस्याची डॉक्टरला मारहाण
शेंबाळपिंपरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल भावसार यांना ग्रामपंचायत सदस्य शे. सलीम शे. नवाज यांनी मारहाण केली. २७ आॅक्टोबरला घडलेल्या या प्रकाराची डॉ. भावसार यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेच्या दिवशी शे. कलीम हा हृदयविकाराचा झटका आलेला आरोपी दुपारी आरोग्य केंद्रात आला होता. त्यावेळी १०८ वर फोन करून रुग्णास पुसदला नेण्याचे डॉक्टरने त्याच्या नातेवाईकास सांगितले. त्यावरुन शे. सलीमने डॉक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी डॉ. भावसार यांच्या तक्रारीवरून शे.सलीम शे.नवाज यांच्याविरुद्ध खंडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर २८ आॅक्टोबर रोजी येथील आरोग्य केंद्राचे काम पूर्णपणे बंद होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शेंबाळपिंपरी केंद्राला सायंकाळी भेट दिली. त्यावेळी आपण या ठिकाणी वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही, असे पत्र डॉ. भावसार यांनी दिले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.पी. सरकुंडे हेसुद्धा येथे राहण्यास तयार नसल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)