पुन्हा उधारीवर ग्रामपंचायत निवडणूकीची नामुष्की
By Admin | Updated: April 9, 2015 00:06 IST2015-04-09T00:06:16+5:302015-04-09T00:06:16+5:30
जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होत आहे.

पुन्हा उधारीवर ग्रामपंचायत निवडणूकीची नामुष्की
यवतमाळ : जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होत आहे. यासाठी जिल्ह्याला चार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. प्रत्यक्षात ग्रामविकास विभागाने जिल्ह्याकडे ४५ लाख रुपयांचाच निधी वळता केला. यामुळे होणाऱ्या निवडणुका प्रशासनाला उधारीवर पार पाडाव्या लागणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार कोटी रुपये लागणार असल्याचा अहवाल निवडणूक विभागाने पाठविला आहे. यानंतरही ४५ लाखांचाच निधी मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला उधारीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मंडप, वीज, डिझेल, वाहतूक, छपाई, अधिकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता, खासगी वाहने, स्पिकर, जनरेटर, शिक्के, व्हीडीओ चित्रिकरण, स्ट्राँग रुमची उभारणी, एसटीचे भाडे, पोस्टर्स, बॅनर, स्ट्रम पेट्या, जेवन, चहा आणि नाश्ता याबाबींसाठी लागणारा निधी आणायचा कोठून हा प्रश्न निवडणूक विभागापुढे आहे. यावर विचार होणे गरजेचे असल्याचे दिसून येते. एकंदरीत मागील अनुभव लक्षात घेता निवडणूक विभागाने उधारीवरच काम भागवावे लागणार
आहे. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचयतींची पोट निवडणूक
जुनी बाकी ५१ लाख रुपये
२०१० पूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी लागलेल्या निधीपैकी ४१ लाख रुपये अद्यापही मिळाले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी लागलेल्या निधीतील दहा लाख रुपयांचा निधी अद्यापही मिळायचा आहे.
दहा हजार नामांकन दाखल
जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी दहा हजार ७०६ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. १० एप्रिल रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.