राज्यपालांच्या नियोजित दौऱ्याने विकास कामांना वेग
By Admin | Updated: December 2, 2014 23:14 IST2014-12-02T23:14:50+5:302014-12-02T23:14:50+5:30
येथील शासकीय आश्रमशाळेला येत्या १० डिसेंबरला राज्यपाल भेट देणार आहे. त्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे़

राज्यपालांच्या नियोजित दौऱ्याने विकास कामांना वेग
शिबला : येथील शासकीय आश्रमशाळेला येत्या १० डिसेंबरला राज्यपाल भेट देणार आहे. त्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे़
येथील आश्रमशाळेला नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली़ जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला आदेश देऊन दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आश्रमशाळेच्या वसतिगृहाचे छत, शौचालय, बाथरूम व किचनची पाहणी करून बांधकाम विभागाने मोजमाप केले. नंतर दुरूस्तीला सुरूवात करण्यात आली आहे़
गेल्या चार वर्षांपूर्वी या आश्रमशाळेचे मुख्याध्यपक भोयर यांनी शाळेतील समस्यांबाबत शासनाला अवगत केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी मांमडलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परिणामी गेल्या चार वर्षांपासून आश्रमशाळेत विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आता १० डिसेंबरला राज्यपाल आश्रमशाळेला भेट देणार असल्याची माहिती मिळताच शाळेचा नकाशा बदलायला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन खडबडून जागे झाले आणि कामाला लागले आहे़ पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रूमाले यांनीही नुकतीच आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी शाळेत चक्क मुक्कामच ठोकला. त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांना विद्यार्थ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही़ त्यामुळे शिक्षक आता विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची माहिती देत आहे़ कधी मुख्यालयी न राहणारे शिक्षक व कर्मचारी आता मुख्यालयी राहताना दिसत आहे़ (वार्ताहर)