शासकीय वाहने जीर्ण
By Admin | Updated: January 25, 2015 23:29 IST2015-01-25T23:29:44+5:302015-01-25T23:29:44+5:30
शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील जुनी शासकीय वाहने आता जीर्ण झाली अहे. ही वाहने आता भंगारात जमा झाली आहे़

शासकीय वाहने जीर्ण
वणी : शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील जुनी शासकीय वाहने आता जीर्ण झाली अहे. ही वाहने आता भंगारात जमा झाली आहे़
येथील पाटबंधारे विभाग, तहसील, पोलीस ठाणे, आरोग्य विभाग आदी शासकीय कार्यालयांत जुनी शासकीय वाहने पडून आहेत़ ही वाहने आता अतिशय जीर्ण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वाहने एकाच ठिकाणी उभी दिसत आहे़ अधिकाऱ्यांना तालुका ठिकाणी दौरा करण्यासाठी व इतर शासकीय कामांकरिता शहरातील बहुतांश कार्यालयात शासनाने वाहने उपलब्ध करून दिली आहे़ या जुन्या वाहनांची मर्यादा संपल्याने आता शासनाने नवीन वाहने अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे़ त्यामुळे जुनी वाहने आता अतिशय जीर्ण होऊन भंगारात जमा झाली अहे. या वाहनांकडे कुणाचेही लक्ष जात नसून अनेक वाहने कार्यालयाच्या मागील बाजून एखाद्या झाडाखाली धूळखात पडून आहे़
येभील पाटबंधारे कार्यालयातील वाहन एका झाडाखाली ठेवण्यात आले आहे़ ते वाहन अतिशय जीर्ण झाले आहे. त्यावर प्रचंड धूळ साचून आहे़ त्याचबरोबर वाहनाच्या आजूबाजूला झाडाझुडूपाने वेढाही दिला आहे़ त्यामुळे त्या वाहनाकडे कुणीच ढुंकूनही पाहत नाही़ या वाहनाकडे कुणाचे लक्ष जात नसल्याने वाहनांच्या सुट्या भागावर चोरटे डल्ला मारण्याची शक्यता बळावली आहे.
इतर विभागांतही जुनी वाहने पडून आहेत. त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. अद्याप अशा वाहनांचा लिलावही झाला नाही. त्यामुळे हजारो, लाखो रुपये किमतीची ही वाहने धूळखात पडून आहे. किमान त्यांचा लिलाव करण्याची गरज आहे. त्या लिलावातून काही प्रमाणात पैसे वसूल होण्याची शक्यता आहे. हाच पैसा दुसऱ्या उपयोगी पडू शकतो. शेवटी या वाहनांच्या खरेदीसाठी खर्च झालेला पैसा जनतेच्या खिशातूनच गेला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांची काळजी घेण्यासाठी तरी किमान लिलावातून काही रक्कम परत मिळविण्यासाठी हालचाल करणे गरजेचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)