शासकीय रुग्णालय परिसराने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:02+5:30

रुग्णालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुरेंद्र पाल या शिकाऊ डॉक्टरचा खून झाल्यानंतर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मध्यंतरी मेडिकल चौक ते नंदूरकर महाविद्यालय या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यानंतर गुरुवारी पिंपळगाव रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.

The government hospital premises took a deep breath | शासकीय रुग्णालय परिसराने घेतला मोकळा श्वास

शासकीय रुग्णालय परिसराने घेतला मोकळा श्वास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रुग्णालय ते नंदूरकर महाविद्यालय मार्गावरील अतिक्रमण हटविल्यानंतर गुरुवारी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पिंपळगाव रोडवरील अतिक्रमणावरही प्रशासनाने हातोडा घातला. अतिक्रमण हटविल्याने शासकीय रुग्णालयाने आता मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान ही मोहीम राबविताना दुजाभाव केला जात असल्याचीही अनेकांची भावना असल्याचे निवेदन गुरुवारी वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.  दारव्हा नाका, दर्डानगरसह, शारदा चौक ते बसस्थानक, बसस्थानक ते आर्णी नाका, बसस्थानक ते दारव्हा नाका, रेल्वे क्राॅसिंग येथील अतिक्रमण कधी हटविणार असा प्रश्न उपस्थित केला. 

यवतमाळ : गुरुवारी सकाळपासूनच प्रशासनाने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पिंपळगाव रोडवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण हटविल्याने शासकीय रुग्णालयाने मोकळा श्वास घेतला. 
रुग्णालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुरेंद्र पाल या शिकाऊ डॉक्टरचा खून झाल्यानंतर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मध्यंतरी मेडिकल चौक ते नंदूरकर महाविद्यालय या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यानंतर गुरुवारी पिंपळगाव रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.  पथक दाखल झाल्यानंतर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. या मोहिमेमुळे या मार्गावर दिवसभर गोंधळाची स्थिती होती.   
दरम्यान, ॲड. जयसिंह चव्हाण, ॲड. अजय डाखोरे, ॲड. नरेंद्र मेश्राम, ॲड. भारती मेश्राम, ॲड. ए. तगाले, किशोर भवते, गजानन वानखेडे, संदेश भगत, मधुकर पेंदाम, ॲड. एस. व्ही. आठवले, ॲड. सचिन बोबडे, ॲड. राम शेंडे यांच्यासह वकिलांनी गुरुवारी  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून प्रशासनाने अतिक्रमण हटविताना दुजाभाव करू नये, अशी मागणी   केली आहे. अतिक्रमण हटावची कारवाई करताना अनेक ठिकाणी दृश्यस्वरूपात असलेले अतिक्रमण काढण्यात येत नसल्याकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेध. या प्रकारामुळे गोरगरिबात  अस्वस्थता व अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. नियमानुसार सरसकट सर्वांचेच अतिक्रमण काढण्याची मागणी त्यांनी केली. 

शहरातील अनेक मार्ग अतिक्रमणाने केले गिळंकृत

- दारव्हा नाका दर्डानगर चौकापासून थेट लोहारापर्यंत असलेल्या महामार्गाला लागूनचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे. या बरोबरच त्यावर हातगाडे, शोरूम, कार्यालये, कुंपण व दुकाने थाटण्यात आली आहेत. मेनलाईनमध्ये अस्थायी स्वरूपात उभे केलेले दुकानाचे अनेक शेड आहेत. यावरही कारवाई करण्याची गरज आहे. तीच परिस्थिती गोदणी मार्गावरील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरातील येथेही मोठ्या प्रमाणात अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहे. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैशालीनगर ते जय विजय चौकापर्यंतही मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या जागेवर दुकाने व शेड थाटण्यात आली आहेत. रुग्णालय परिसरातील गोरगरिबांची अतिक्रमणे हटवितानाच या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप वकिलांनी निवेदनात केला आहे.

मेडिकल परिसरात डाॅक्टरचा खून झाला. यानंतर खुनाच्या प्रयत्नाची घटना घडली. यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अतिदक्षता म्हणून या ठिकाणावर कारवाई करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नाही. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल.      
- माधुरी मडावी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, यवतमाळ. 

 

Web Title: The government hospital premises took a deep breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.