कळंब एमआयडीसीतून शासकीय धान्याची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:28 IST2018-08-19T22:27:10+5:302018-08-19T22:28:28+5:30
कळंब शहरातील एमआयडीसी परिसरातून शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात काळ््याबाजारात विक्री सुरू होती. टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री धाड टाकून २०५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शासकीय शिक्का असलेल्या गोणीतून हा तांदूळ इतर पोत्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते.

कळंब एमआयडीसीतून शासकीय धान्याची तस्करी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कळंब शहरातील एमआयडीसी परिसरातून शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात काळ््याबाजारात विक्री सुरू होती. टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री धाड टाकून २०५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शासकीय शिक्का असलेल्या गोणीतून हा तांदूळ इतर पोत्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
पोलीस रेकॉर्डवर तडीपार असलेला कुख्यात शेख रहीम शेख करीम (४०) रा. माथा कळंब, हल्ली मुक्काम वर्धा याला अटक करण्यात आली. शेख रहीम हा शासकीय तांदूळ पोते बदलवून लगतच्या जिल्ह्यात विकत असल्याची माहिती टोळी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली. त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शासकीय पंचासमक्ष धाड टाकली. कळंब एमआयडीसीतील प्लॉट नंबर ए-५ येथे हा साठा सापडला. ४१० शासकीय कट्ट्यावर ‘गव्हर्मेंट आॅफ हरियाणा क्रॉप इयर २०१७-०१८’ असे लिहले आहे. त्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे. हा साठा पोलिसांनी पुरवठा अधिकाऱ्यांच्या मदतीने सिल केला. ही कारवाई रविवारी पहाटे चार वाजतापर्यंत सुरू होती. आरोपी विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ही कामगिरी एसपी एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात टोळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, सहायक फौजदार ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, विनोद राठोड, आशिष गुल्हाणे, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, आकाश सहारे, राजकुमार कांबळे, यशवंत जाधव, शशिकांत चांदेकर, राहुल जुकूंटवार यांनी केली.
धान्य तस्करावर पूर्वीच ५० गुन्हे नोंद
शासकीय तांदळाची खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या शेख रहीम शेख करीम याच्यावर विविध प्रकारचे ५० गुन्हे नोंद आहेत. त्याला कळंबमधून तडीपार केले होते. त्याच्यासोबत तांदूळ तस्करीत मोठे रॅकेट सक्रीय आहे. या तस्करीची पाळेमुळे पुरवठा विभागापर्यंत पोहोचलेली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कळंब पोलीस आता पुढील तपास किती सखोल करतात, यातून धान्य तस्करीची व्याप्ती किती हे स्पष्ट होणार आहे.