राजकीय ठेकेदार कर्मचाऱ्यांवर वरचढ

By Admin | Updated: July 11, 2016 02:17 IST2016-07-11T02:17:51+5:302016-07-11T02:17:51+5:30

विकास कामे घेऊन स्वत:चा शक्य होईल तितका विकास करण्यासाठी तालुक्यात राजकीय ठेकेदारांचे पेव आले आहे.

Government contractor tops employees | राजकीय ठेकेदार कर्मचाऱ्यांवर वरचढ

राजकीय ठेकेदार कर्मचाऱ्यांवर वरचढ

नेरमध्ये हमरीतुमरी : विकास कामातील घोटाळ्यावर बोट ठेवल्याने निर्माण झाला वाद
नेर : विकास कामे घेऊन स्वत:चा शक्य होईल तितका विकास करण्यासाठी तालुक्यात राजकीय ठेकेदारांचे पेव आले आहे. त्यांनी केलेल्या कामांच्या घोटाळ्याविषयीसुद्धा बोलता येत नाही. बोलाल तर वादच नव्हे तर मार खाण्याचीही तयारी ठेवावी लागेल. अशीच काहिशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. येथील एका शासकीय कार्यालयात घडलेल्या प्रकाराने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तालुक्याच्या प्रत्येक विभागात विकास कामांची गर्दी झाली आहे. जलयुक्त शिवार, रस्त्याचे डांबरीकरण, पाझर तलाव आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून या कामांना गती देण्यात आली आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या या कामांमध्ये राजकीय ठेकेदारांचा शिरकाव वाढला आहे. त्यांनी केलेल्या कामाची चौकशी अपवादानेच होते.
काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे बिलही तत्काळ काढावे लागते. एखाद्या कर्मचारी वा अधिकाऱ्याने त्यात अडथळा आणल्यास ‘परिणाम’ भोगावे लागतात. त्यामुळे अपवादानेच त्यांची बिले अडतात. अशाच एका राजकीय ठेकेदाराने एका कामाचे बिल संबंधित कार्यालयाला सादर केले. एका कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखविला. त्याचा परिणाम वेगळा झाला. संबंधित कंत्राटदार या कर्मचाऱ्यावर जाम चिडला. आपली ओळख नाही काय, अशी विचारणा केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर या कर्मचाऱ्याच्या कानशीलातही लगावली.
उपस्थित काही जणांनी मध्यस्थी करून हा प्रकार थांबविला. पण कंत्राटदाराने आपला तोरा आणखी दाखविणे सुरू केले. तू पोलिसात गेला तरी आपले काही होणार नाही, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूणच तालुक्यात राजकीय ठेकेदार कर्मचाऱ्यांवर ‘भारी’ होत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास शासनाचे खर्च होणारे लाखो रुपये पाण्यात जाणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या राजकीय ठेकेदारांना नियंत्रणात आणावे, अशी अपेक्षा आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Government contractor tops employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.