शासकीय काेविड रुग्णालयातील ५७७ खाटा झाल्या हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST2021-04-12T05:00:00+5:302021-04-12T05:00:06+5:30
शासकीय काेविड रुग्णालयात गंभीर व अतिगंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्याच रुग्णाला दाखल करण्याचे निर्देश आहेत. काेविड केअर सेंटर आणि काेविड हेल्थ सेंटर येथे साैम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णावर उपचार करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष मात्र तेथे रुग्ण जात नाहीत. त्यांना थेट शासकीय काेविड रुग्णालयातच पाठविण्यात येते. त्यामुळे गरज नसलेल्या रुग्णांनी शासकीय काेविड रुग्णालय भरले आहे.

शासकीय काेविड रुग्णालयातील ५७७ खाटा झाल्या हाऊसफुल्ल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काेराेना महामारीने भयानक रूप धारण केले आहे. शनिवारी रात्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काेराेनाचे १७ संशयित रुग्ण दाखल झाले. त्यांना रविवारी दुपारपर्यंत वाॅर्डमध्ये हलविण्यात आले नाही. रुग्णालय प्रशासनाला प्रचंड कसरत करावी लागत आहे. साैम्य व मध्यम लक्षण असलेले रुग्ण शासकीय काेविड रुग्णालयात दाखल हाेत असल्याने काेविड रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. यामुळे रुग्णांची परवड हाेत आहे.
शासकीय काेविड रुग्णालयात गंभीर व अतिगंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्याच रुग्णाला दाखल करण्याचे निर्देश आहेत. काेविड केअर सेंटर आणि काेविड हेल्थ सेंटर येथे साैम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णावर उपचार करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष मात्र तेथे रुग्ण जात नाहीत. त्यांना थेट शासकीय काेविड रुग्णालयातच पाठविण्यात येते. त्यामुळे गरज नसलेल्या रुग्णांनी शासकीय काेविड रुग्णालय भरले आहे. याच प्रकारातून शनिवारी रात्री ऑक्सिजनची गरज असलेले गंभीर रुग्ण रविवारी दुपारपर्यंत ‘वेटिंग’वर हाेते. काेराेनामुळे प्रत्येक जण हादरलेला आहे. थाेडी लक्षण दिसली तरी संबंधित व्यक्ती थेट रुग्णालयात धाव घेते. यातून शासकीय काेविड रुग्णालयाची यंत्रणा काेलमडण्याच्या मार्गावर आहे. कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या वेळेस दाखल करण्याची सुविधाही नसल्याचा परिणाम आहे.
रात्री काेविड सेंटर बंद
काेविड सेंटर व डेडिकेटेड काेविड हेल्थ सेंटर येथे रात्रीच्या वेळी रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. या ठिकाणी रात्री डाॅक्टर नसतात. त्यामुळे रुग्ण थेट शासकीय काेविड रुग्णालयात जात आहे. परिणामी तेथे रुग्णांची गर्दी वाढली आहे. काेविड सेंटर व हेल्थ सेंटर येथे काेणताच उपचार केला जात नाही, असा समज तयार झाला आहे. डाॅक्टर राहत नसल्याने रुग्णाची पसंती ही शासकीय काेविड हाॅस्पिटलला आहे.
काेविड रुग्णालयात १०० रुग्ण असे आहेत, ज्याच्यावर काेविड व हेल्थ सेंटर येथे उपचार हाेऊ शकताे. अशा रुग्णामुळे गंभीर व अतिगंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत बेड देताना अडचण हाेत आहे. रुग्णांची याेग्य वर्गवारी हाेण्याची गरज आहे. काेविड हाॅस्पिटलवर यामुळे ताण वाढत आहे.
- डाॅ. मिलिंद कांबळे,
अधिष्ठाता,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय