कुमारीमातेच्या प्रज्ञावंत कन्येला अखेर मिळाले जात प्रमाणपत्र
By Admin | Updated: September 9, 2016 02:49 IST2016-09-09T02:49:41+5:302016-09-09T02:49:41+5:30
जात प्रमाणपत्राअभावी एका कुमारी मातेच्या प्रज्ञावंत कन्येचे शैक्षणिक भविष्यच टांगणीला लागले होते.

कुमारीमातेच्या प्रज्ञावंत कन्येला अखेर मिळाले जात प्रमाणपत्र
महसूलचा पुढाकार : अनेकांनी दिला मदतीचा हात
उमरखेड : जात प्रमाणपत्राअभावी एका कुमारी मातेच्या प्रज्ञावंत कन्येचे शैक्षणिक भविष्यच टांगणीला लागले होते. प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही तिला जात प्रमाणपत्र मिळत नव्हते. अखेर ‘लोकमत’मध्ये तिची कहाणी प्रसिद्ध झाली. महसूल विभाग खडबडून जागा झाला. सामाजिक संघटना आणि महसूल विभागाच्या पुढाकारातून अखेर गुरुवारी त्या कन्येला जात प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
उमरखेड तालुक्यातील जनुना येथील एका कुमारी मातेची कन्या पुसद येथे नवव्या वर्गात शिकत आहे. परंतु वडील नसल्याने जात प्रमाणपत्रासाठी अडचण येत होती. जात प्रमाणपत्र नसल्याने तिला विविध सवलतींचाही लाभ मिळत नव्हता. शिक्षक दिगांबर तडोले आणि नागोराव बुरकुले यांच्या सहकाऱ्याने गत सहा महिन्यांपासून ती महसूलचे उंबरठे झिजवित होते. तिचा हा संघर्ष सुरू होता. परंतु प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. अखेर ‘लोकमत’मध्ये ‘कुमारी मातेची प्रज्ञावंत कन्या शोधतेय जात’ असे वृत्त प्रसिद्ध झाले. अंगावर शहारे आणणारे हे भयानक वास्तव प्रकाशित होताच सांगली येथील जयश्री सावंत, यवतमाळ येथील प्रमोदिनी रामटेके, अमरावतीच्या आशा गालट यांनी पुढाकार घेतला. अमरावती विभागीय आयुक्त, यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून सदर मुलीला जात प्रमाणपत्र देण्यासाठी विनंती केली. यवतमाळ येथील अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी यासाठी पुढाकार घेतला. उमरखेडचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांना जात प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उमरखेड तहसीलदार भगवान कांबळे यांनी तिच्या कागदपत्रांची पूर्तता केली. यासाठी तलाठी सचिन फटाले, मंडळ अधिकारी एस.पी. मून, नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी पुढाकार घेतला. संपूर्ण प्रकरण तयार करून उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्याकडे पाठविण्यात आले. शासकीय सोपस्कार पार पाडून गुरुवारी सदर कन्येला रितसर जात प्रमाणपत्र देण्यात आले. आता तिच्या शैक्षणिक प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (शहर प्रतिनिधी)
‘लोकमत’चे मानले आभार
जनुना येथील कुमारीमातेच्या कन्येला जात प्रमाणपत्रासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनातील सहृदयी अधिकाऱ्यांमुळे या कन्येला जात प्रमाणपत्र मिळाले. शिक्षक दिगांबर तडोले व नागोराव बुरकुले यांनी तिला साथ दिली. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळेच जात प्रमाणपत्र मिळाले, असे म्हणत दिगंबर तडोले यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.