सहा हजार नागरिकांना रेशन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:01 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:01:04+5:30
नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागला. यामुळे संतप्त नगरसेवकांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला या मेसेजबद्दल जाब विचारला. हा मेसेज फेक असल्याचे निदर्शनास येताच नोडल अधिकाऱ्यांनी त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. आता त्या व्यक्तीचा शोध सायबर सेलकडून घेतला जात आहे.

सहा हजार नागरिकांना रेशन द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाने धान्य वितरणाची घोषणा केली. परंतु नागरिकांच्या घरापर्यंत धान्यच पोहोचले नाही. आता शहरीभागातील नागरिक नगरसेवकांच्या घरांवर तुटुन पडत आहेत. यामुळे संतप्त नगरसेवकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तर पुरवठा विभागाने तूर्त अशा नागरिकांना धान्य देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गरजवंतांना धान्य अथवा भोजन पुरविण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने नागरी सुविधा केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. संतोष डोईफोडे यांनी स्वयंसेवी संस्थांना गरजवंताची माहिती नगरसेवकांकडून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगरसेवकांनीही गरजवंत आणि कार्डची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाकडे दिली. तब्बल सहा हजार व्यक्तींच्या नावाचा यामध्ये समावेश आहे.
यासंदर्भात सोशल मीडियावर खोटा मेसेज व्हायरल झाला. ज्यात नगरसेवकांकडे सर्व धान्य आणि वस्तू पुरविल्याचा उल्लेख आहे. यातून नगरसेवकांकडे नागरिकांची झुंबड उडाली आहे. नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागला. यामुळे संतप्त नगरसेवकांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला या मेसेजबद्दल जाब विचारला. हा मेसेज फेक असल्याचे निदर्शनास येताच नोडल अधिकाऱ्यांनी त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. आता त्या व्यक्तीचा शोध सायबर सेलकडून घेतला जात आहे.
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक विजय खडसे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक चंदू चौधरी, नगरसेवक प्रा.डॉ. अमोल देशमुख, नगरसेवक गणेश धवने, नगरसेवक विशाल पावडे, नगरसेविका वैशाली सवई उपस्थित होते.
केशरी कार्डधारक अद्यापही प्रतीक्षेतच
केशरी कार्डधारकांना धान्य वितरीत करण्याच्या सूचना आहेत. मात्र मेपासून हे धान्य वितरित करण्यात येणार आहे. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी शालीकराम भराडी यांनी यावेळी दिली.