वसतिगृहातील मुली धडकल्या दिग्रस ठाण्यात
By Admin | Updated: February 29, 2016 01:58 IST2016-02-29T01:58:03+5:302016-02-29T01:58:03+5:30
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या मुलींना शिक्षा करणाऱ्या गृहपालाविरुद्ध येथील आदिवासी मुलींच्या ..

वसतिगृहातील मुली धडकल्या दिग्रस ठाण्यात
गृहपालाविरुद्ध तक्रार : आदिवासी वसतिगृहातील ६३ मुलींनी वाचला गैरव्यवस्थेचा पाढा
दिग्रस : वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या मुलींना शिक्षा करणाऱ्या गृहपालाविरुद्ध येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील सुमारे ६३ विद्यार्थिनी रविवारी दिग्रस पोलीस ठाण्यात धडकल्या. वसतिगृहातील गैरव्यवस्थेचा पाढा वाचत गृहपालाविरुद्ध तक्रार दिली. दरम्यान गृहपालांनीही या मुलींविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी दोनही तक्रारी चौकशीत ठेवल्या.
दिग्रस येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात ६३ मुली राहतात. शनिवारी रात्री या वसतिगृहाचा वीज पुरवठा खंडित झाला. इन्व्हर्टर बंद असल्याने अंधार पसरला होता. अंधारामुळे मुली भयभीत झाल्या. त्या ओरडू लागल्या. त्यामुळे या वसतिगृहाच्या महिला गृहपालांनी या मुलींना छडीने मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करीत रविवारी दुपारी सुमारे ६३ विद्यार्थिनी दिग्रस पोलीस ठाण्यात धडकल्या. त्यांनी गृहपाल समता कांबळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तर गृहपाल कांबळे यांनीसुद्धा या मुली अंगावर धावून आल्याची तक्रार पोलिसात दिली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी दोनही तक्रारी चौकशीत ठेवल्या असून या प्रकरणी काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)