सुन्ना गावात घोरपड पकडली; आरोपीला वन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:22 IST2020-06-25T23:22:11+5:302020-06-25T23:22:34+5:30
पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत सुन्ना या गावात विष्णू इस्तारी अगिलवार यांच्या घरी वन्यप्राणी घोरपड पकडून आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली.

सुन्ना गावात घोरपड पकडली; आरोपीला वन कोठडी
पांढरकवडा (यवतमाळ) : पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या सुन्ना या गावात गुरुवारी घोरपड पकडण्यात आली. यामध्ये आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाद्वारे वन गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला वन कोठडी सुनावण्यात आली.
पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत सुन्ना या गावात विष्णू इस्तारी अगिलवार यांच्या घरी वन्यप्राणी घोरपड पकडून आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आरोपी विष्णू इस्तारी अगिलवार यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांच्या घरून जिवंत घोरपड, घोरपडीचे शिजवलेले मांस, मोठ्या प्रमाणात शिकारीचे साहित्य मिळाले.
आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, आर/डब्ल्यू ५१ अन्वये वन गुन्हा जारी करण्यात आला आहे. आरोपींनी त्यांच्या बयाणात मांस सुन्ना येथीलच इतर व्यक्तींना विकल्याचे सांगितले. त्यावरून सुन्ना गावातूनच संजय बंडू मेश्राम व गंगूबाई पोषट्टी आत्राम यांच्याविरुद्धसुद्धा वन गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयाने आरोपी विष्णू इस्तारी अगिलवार यास दोन दिवसांची वन कोठडी मंजूर केली आहे. सदर प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा, सहायक वनसंरक्षक आर.के. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता आनंदराव कोकणे करीत आहे. न्यायालयाच्या परवानगीने जप्त करण्यात आलेले जिवंत घोरपड नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक एस. कोकणे, वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा व्ही.एम. दुबे, पी.व्ही. सोनुले, डी.ए. मेश्राम, शशिकांत आखरे, एस.एम. येडमे, व्ही.एस. चौधरी, आर.एस. सोनी, एस.के. आवरे यांनी पार पाडली.