घोन्सा खुली खाण पडली बंद
By Admin | Updated: May 6, 2016 02:22 IST2016-05-06T02:22:12+5:302016-05-06T02:22:12+5:30
तालुक्यातील घोन्सा येथील खुली कोळसा खाण ही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लॉस्टिंगपासून दिलासा मिळाला आहे.

घोन्सा खुली खाण पडली बंद
उत्पादन ठप्प : आठ-नऊ महिन्यांपासून खाण ओसाड
वणी : तालुक्यातील घोन्सा येथील खुली कोळसा खाण ही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लॉस्टिंगपासून दिलासा मिळाला आहे.
घोन्सा परिसरात वेकोलिची कुंभारखणी येथे भूमिगत कोळसा खाण, तर घोन्सा येथे खुली कोळसा खाण आहे. या दोनही खाणींमधून दररोज हजारो टन कोळशाचे उत्खनन केले जात होते. यातील केवळ कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र घोन्सा खुली खाण ही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे उत्पादनही ठप्प पडले आहे.
या खाणीचा कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आला होता. कंपनीचा करार संपताच ही खाण बंद करण्यात आली. त्यामुळे आता तेथे ब्लॉस्टिंगद्वारे कोळसा काढण्याचे काम सध्या बंद आहे. परिणामी परिसरातील घोन्सा व कुंभारखणी गावाला ब्लॉस्टिंगच्या धक्क्यापासून दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर वेकोलिने रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याची विल्हेवाट लावल्याने ढिगारेही कमी झाले आहे. त्यामुळेही ग्रामस्थांना दिलासा मिळाला. याबाबत खाणीचे सब एरिया मॅनेजर मिश्रा यांना विचारणा केली असता, या खाणीचे टेंडर वरिष्ठ पातळीवरून काढण्यात येते. जेव्हा ही खाण सुरू करण्याचे आदेश येईल, तेव्हा ही खाण पुन्हा सुरू करून तेथून कोळसा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)