पाणी दानासाठी सरसावले उदार हात
By Admin | Updated: March 9, 2016 00:09 IST2016-03-09T00:09:42+5:302016-03-09T00:09:42+5:30
ढाणकीतील नागरिक गत अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. पाण्याच्या शोधासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. अशा परिस्थितीत एका दानशूर व्यक्तीने पाणी वाटपाचे औदार्य दाखविले.

पाणी दानासाठी सरसावले उदार हात
नागरिकांना दिलासा : ढाणकीच्या पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न
ढाणकी : ढाणकीतील नागरिक गत अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. पाण्याच्या शोधासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. अशा परिस्थितीत एका दानशूर व्यक्तीने पाणी वाटपाचे औदार्य दाखविले. नागरिकांना पाणी समस्येपासून दिलासा देण्यासाठी त्यांनी आपली बोअरवेल नागरिकांसाठी खुली करून दिली आहे.
पाणीटंचाई आणि ढाणकी असे समीकरण आता नवे नाही. वर्षानुवर्षे ढाणकीकर पाणीटंचाईचा सामना करीत आहे. दोन वर्षांपासून कमी पावसाने ढाणकीकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे डिसेंबर अखेरपासूनच पाणीटंचाईचे वेध लागले आहे. फेब्रुवारीत ढाणकीला पाणी पुरवठा करणाऱ्या दोनही विहिरी कोरड्या पडल्या आहे. नदी तर आटलेलीच आहे. त्यामुळे खासगी विहिरी अधिग्रहित करून त्यावरून पाणी घेऊन पाणी प्रश्नाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने चालविला आहे. परंतु २० हजार लोकवस्तीच्या गावकऱ्यांना यामुळे दिलासा मिळत नाही. दुष्काळात गरीब आणि श्रीमंत सर्वच पाण्यासाठी भटकत आहे.
अशा या दुष्काळी ढाणकीत मनाची श्रीमंत असलेली मंडळीही कमी नाही. पाणी दान करण्याचा संकल्प या मंडळींनी केला आहे. यात ओमप्रकाश जयस्वाल, दिगांबर कोटरवार, प्रफुल्ल कोठारी, प्रदीप मिटकर यांचा समावेश आहे. ही मंडळी आपल्या बोअर आणि विहिरीवरील मोटारपंप सुरू करून जनतेला पाणी देत आहे. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांची परवड थांबली आहे. (वार्ताहर)