यवतमाळातील उद्याने उदंड, अवस्था बकालच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:18+5:30
शहराच्या विविध भागात एकूण २२ उद्याने आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि हरित पट्ट्याचा विकास, या योजनेतून काही उद्याने नगरपरिषदेने विकसित केली. काही उद्याने तत्कालीन पालकमंत्र्यांच्या विकास निधीतून सुशोभित करण्यात आली. आॅगस्ट २०१९ मध्ये उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीच्या जुन्या टेंडरची मुदत संपली. त्यानंतर उद्यानांच्या सुरक्षेसोबत विकासकामांचे नवीन टेंडर निघणे अपेक्षित होते. मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी टेंडर काढलेच नाही.

यवतमाळातील उद्याने उदंड, अवस्था बकालच
रुपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील आबालवृद्धांसाठी उद्यानांची निर्मिती करण्यात आली. मात्र आता याच उद्यानांत त्यांच्याऐवजी केवण प्रेमी युगल फिरताना दिसून येतात. टपोरींचे ठिय्ये दिसतात. सामान्य व सभ्य नागरिकांना या उद्यानांत दोन क्षण निवांत बसणे अवघड झाले आहे. विशेषता सायंकाळी तर भयावह अवस्था असते. रात्रीच्या अंधारात अनेक जोडपी, मद्यपी, व्यसनी या उद्यानांचा ताब घेतात. अनेक नको ते प्रकार तेथे सुरू असतात. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. परिणामी ही उद्याने बकाल आणि भकास झाली आहेत.
शहराच्या विविध भागात एकूण २२ उद्याने आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि हरित पट्ट्याचा विकास, या योजनेतून काही उद्याने नगरपरिषदेने विकसित केली. काही उद्याने तत्कालीन पालकमंत्र्यांच्या विकास निधीतून सुशोभित करण्यात आली. आॅगस्ट २०१९ मध्ये उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीच्या जुन्या टेंडरची मुदत संपली. त्यानंतर उद्यानांच्या सुरक्षेसोबत विकासकामांचे नवीन टेंडर निघणे अपेक्षित होते. मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी टेंडर काढलेच नाही. त्यामुळे या उद्यानाच्या देखभालीसाठी असलेले जुने कामगार काम सोडून गेले. आता या ठिकाणी कुणाचाही पहारा नाही. परिणामी तार कंपाउंड जागोजागी तोडण्यात आले. आता उद्यानांत चक्क स्वैराचार सुरू झाला.
शिवाजी गार्डनला दृष्ट लागली. तेथील उंच डेरेदार वृक्ष तोडण्यात आले. तेथील खेळणी तुटली. घसरगुंडीला खालचा पत्राच शिल्लक नाही. घोडागाडीच्या सिट्सच उरल्या. ट्रॅकवर मोकाट जनावरांच्या विष्टा साचल्या. झाडांना पाणी नाही. तेथील ट्रेन पूर्णत: जीर्ण झाली. विहिरीतील पाण्याला शेवाळ लागले. एकूणच उद्यान भकास झाले आहे.
आझाद मैदानातील नेहरू उद्यानाची अवस्था यापेक्षाही वाईट आहे. तेथे कचºयाचे ढीग साचले. बाहेर बंदचे बोर्ड लागले. मात्र आत दारूच्या बॉटल, दारू पाऊच, प्लास्टिक ग्लास यांचा खच दिसतो. नवीन खेळणी उद्घाटनापूर्वीच तुटली. अभिनव कॉलनीतील छत्रपती मैदानाची अवस्थाही तशीच. अतिशय देखणे असलेल्या या मैदानाला सुरक्षेचे ग्रहण लागले. तेथे विद्यार्थी जोडपे पहायाला मिळतात. जिमचे साहित्य तुटले. पत्रकार कॉलनीतील उद्यानाची अवस्था न सांगितलेलीच बरी. तेथे हिरवळ नावालाही दिसत नाही.
शिवाजी मैदानात सकाळपासून आबालवृद्धांची गर्दी होते. मात्र सुरक्षा भींत एका ठिकाणी खचली. सावरकर मैदानाची अवस्था बिकटच आहे.
धावपळीच्या जीवनातून दोन क्षण विश्रांती काढून निवांत बसावे म्हणून यवतमाळ शहरात उद्यानांची निर्मिती केली गेली. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला गेला. सध्या उद्यानांकडे बघितल्यास भयावह अवस्था दिसून येते. सर्वच उद्याने भकास आणि बकाल झालेली दिसून येतात. शहरातील २२ उद्यानांची गत दयनीय झाली आहे. बहुतांश उद्यानांमध्ये दोन क्षण विश्रांती घेणेही दुरापास्त झाले आहे. सभ्य आणि सामान्य नागरिकांना या उद्यानांमध्ये जाणे अवघड झाल्याचे दिसत आहे.
पालकांनो सावधान...
आपली मुले चांगली आहे. ती कुणाच्याही फ ंदात पडत नाही. या गैरसमजात राहू नका. शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थी अशा बगिच्यांमध्ये बसलेले असतात. फोनवर बोलतात. नको तो प्रकार करतात. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज आहे.
बीओटी तत्वावर उद्याने देण्यात यावी, असा प्रस्ताव सभागृहात आला. त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू झाल्या नाहीत. यापूर्वीही निविदा काढण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. मात्र निविदा निघाल्या नाही.
कांचन चौधरी
नगराध्यक्ष, यवतमाळ
उद्याने बकाल झाली. त्याचे सौंदर्यीकरण करावे. तत्काळ निविदा काढून देखभाल, दुरुस्तीचे काम सुरू करावे.
- चंद्रशेखर चौधरी
विरोधी पक्षनेते, नगरपरिषद यवतमाळ
दामिनी पथक गेले कुठे?
रोडरोमियोवर वचक ठेवण्यासाठी दामिनी पथक आहे. मात्र अनेक प्रेमी युगल या उद्यानात नको ते करीत असताना हे पथक जाते कुठे, असा प्रश्न आहे. सार्वजनिक स्थळी हा प्रकार थांबावा म्हणून दामिनी पथकाने अशांवर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.