गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाखांचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:47 IST2017-08-28T22:46:31+5:302017-08-28T22:47:01+5:30

गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाखांचा पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या माध्यमातून टाटा व रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास दूत नेमण्यात आले. याच अनुषंगाने तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, आनंद महिंद्रा आदींच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपककुमार सिंगला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तत्पूर्वी ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑातील आठ जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावांतील कामाचे सादरीकरण केले. यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण सीईओ डॉ. दीपककुमार सिंगला यांनी केले. यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उत्कृष्ठ ठरले.
या मिशनअंतर्गत जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यात कळंब तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी गणेशवाडीच्या विकासात्मक आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री व प्रमुख पाहुण्यांच्या पसंतीस पडले. त्यामुळे गणेशवाडीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास दूतांची निवड करण्यात आली. दूतांच्या माध्यमातून गाव व ग्रामपंचायतीचा अभ्यास करणे, जास्तीत-जास्त लोकांच्या सहभागातून ग्रामविकासचा आराखडा तयार करणे, शासकीय यंत्रणांशी समन्वय आदी कामे केली जातात. गणेशवाडी या गावाला पुरस्कार मिळण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, ग्रामसेवक गणेश जाधव, ग्रामविकास दूत मयुरी महातळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
गणेशवाडी ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट - सीईओ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांनी गणेशवाडी गावाच्या सादरीकरणास पसंती दिली. त्यावरून या पुरस्काराची घोषणा झाली. आता या निधीतून गावाचा विकास साधला जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपककुमार सिंगला यांनी दिली.