गांधी मार्केट चोरट्यांच्या निशाण्यावर
By Admin | Updated: March 29, 2017 00:28 IST2017-03-29T00:28:49+5:302017-03-29T00:28:49+5:30
स्थानिक इंदिरा गांधी मार्केटमध्ये सातत्याने दुकान फोडून मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडत आहेत.

गांधी मार्केट चोरट्यांच्या निशाण्यावर
यवतमाळ : स्थानिक इंदिरा गांधी मार्केटमध्ये सातत्याने दुकान फोडून मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडत आहेत. रविवारी रात्री चोरट्यांनी चिंतामणी बाजारमध्ये पहिल्या माळ््यावर असलेल्या गोदामाचे शटर वाकवून खेळणी चोरली. ही घटना सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी बाजूच्या रेडिमेड कापड दुकानातही चोरीचा प्रयत्न केला.
शौकत हबीबभाई अडतीय यांचे इंदिरा गांधी मार्केटमध्ये दुकान आहे. त्यांनी दुकानाचा माल साठविण्यासाठी चिंतामणी बाजार कॉम्पलेक्समध्ये गोडावून घेतले आहे. याच गोदामातून चोरट्यांनी सहा हजार रुपये किंमतीचे खेळणे लंपास केले. लगतच राजेश मेबनदास पाहुजाणी यांचे दुकान आहे. त्याही दुकानाचे शटर वाकविण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. बर्मुडा, टी-शर्ट घातलेल्या दोघांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते.
शहर पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून रेकॉर्डवरील चोरट्यांची झडती घेणे सुरू आहे. आरोपींची ओळख पटल्याने त्यांना त्वरित अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. गुन्ह्याचा तपास जमादार गजानन क्षीरसागर कीरत आहेत. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी याच दुकानासमोरून भंगार चोरून नेले होते. मात्र किरकोळ बाब म्हणून तक्रार करण्यात आली नाही. स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील एका आरोपीला अटक केल्यानंतर चोरीचे सत्र थांबले होते. मात्र आता आणखी चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)