दुर्मिळ नाण्यांतून साकारले गणरायाचे मखर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:41 IST2017-08-26T21:41:12+5:302017-08-26T21:41:34+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आकर्षक देखाव्यांसाठी प्रचंड मेहनत घेतातच. मात्र, एका गणेशभक्ताने आपल्या घरगुती गणेशासाठी केलेल्या मखराने या मंडळांनाही मागे टाकले आहे.

दुर्मिळ नाण्यांतून साकारले गणरायाचे मखर!
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आकर्षक देखाव्यांसाठी प्रचंड मेहनत घेतातच. मात्र, एका गणेशभक्ताने आपल्या घरगुती गणेशासाठी केलेल्या मखराने या मंडळांनाही मागे टाकले आहे. तब्बल ५ हजार दुर्मिळ नाण्यांच्या संग्रहातून साकारलेले हे मखर सध्या यवतमाळात चर्चेचा विषय ठरत आहे.
स्थानिक मारवाडी चौकातील सुमित हेमंत महेंद्रे यांच्या घरी गणेशोत्सवाचे ५१ वे वर्ष आहे. महेंद्रे यांनी १८५१ ते २०१७ पर्यंतचे विविध नाणे संग्रही केले. यंदा त्यातूनच गणरायाच्या मखराची निर्मिती केली. यामध्ये मोगलकालीन, शिवकालीन, ब्रिटिशकालीन, स्वातंत्र्योत्तर काळातील नाणे आणि सध्याची प्रचलीत नाणी यामध्ये वापरण्यात आली आहेत.
यामध्ये अर्धा आणा, १ आणा, २ आणा, कत्तू, एक पैसा, २, ३, ५, १०, २५, ५० पैसे, १, २, ५, १० रूपयांची विविध रंगाची नाणी आहेत. पितळ, कासे, तांबे, जर्मन आणि चांदीच्या नाण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. हे मखर तयार करण्यासाठी २० दिवस लागले.
भक्तांना कर भरण्याचे आवाहन
जीएसटीचा अर्थ अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न सुमित महिंद्रे यांनी केला आहे. जी म्हणजे गणेश, एस म्हणजे संदेश आणि टी म्हणजे टॅक्स भरा असे सविस्तर विवरण त्यांनी लिहिले आहे. देश घडवायचे असेल तर जीएसटी भरलाच पाहिजे, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
मूर्तीला कलदाराचा आकार
महेंद्रे यांनी स्थापन केलेली मूर्तीही खास आहे. मातीच्या मूर्तीला कलदाराचा आकार देण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण भाग रूपयाच्या डिझाईनने देखणा करण्यात आला आहे. यामुळे ही मूर्ती मातीची असेल असे पाहताक्षणी वाटतच नाही.