बोरीअरबमध्ये आरोग्य केंद्राची प्रेतयात्रा
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:54+5:302016-04-03T03:51:54+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाही.

बोरीअरबमध्ये आरोग्य केंद्राची प्रेतयात्रा
बोरीअरब : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाही. आरोग्य केंद्राला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा स्थितीत शुक्रवारी रात्री गावातील एका रुग्णाला घेऊन आरोग्य केंद्रात आले होते. मात्र येथे परिचारिकेशिवाय इतर कोणताही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी शनिवारी सकाळी आरोग्य केंद्राची साफसफाई करून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.
निलेश तिवारी व धर्मेंद्र बोरकर आरोग्य केंद्रात उपचारासाठी रुग्णाला घेऊन गेले होते. त्यांना येथील गैरप्रकार आढळून आला. त्यानंतर शनिवारी सकाळी ओमप्रकाश लढ्ढा, बबलू जयस्वाल, जीवन बोरकर, निलेश तिवारी, चेतन देशमुख, वसंतराव जांभोरे, नागोराव भगत, लखन बागडे, रणजित काकडे, विनोद कावरे, जावेद पठाण, शंकर गौरकार, जहागीरखॉ पठाण आदी गावकऱ्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले. याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड, हिवताप अधिकारी सुरेश तरोडकर यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली.
यावेळी आरोग्य केंद्रातील अधिकारी डेहणकर, दुधे यांच्यासह कर्मचाऱ्यांची या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. केंद्राचे काम सुधारण्याचे निर्देश दिले. (वार्ताहर)