अनिश्चित कापूस दराने शेतकऱ्यांमध्ये निराशा
By Admin | Updated: February 15, 2016 02:38 IST2016-02-15T02:38:46+5:302016-02-15T02:38:46+5:30
कापसाचे दर वधारतील आणि त्यामुळे बाजारात कापसाला थोडा अधिक दर मिळून चार पैसे आणखी हातात पडेल, ....

अनिश्चित कापूस दराने शेतकऱ्यांमध्ये निराशा
तेजीची आशा मावळली : राळेगावातील काही व्यापाऱ्यांचे जिनिंग प्रेसिंग बंद
राळेगाव : कापसाचे दर वधारतील आणि त्यामुळे बाजारात कापसाला थोडा अधिक दर मिळून चार पैसे आणखी हातात पडेल, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाळगलेली आशा आता निराशेत बदलत चालली आहे. कापसाचे दर मागील दोन-तीन आठवड्यांपासून चार हजार ४०० रुपयाच्या जवळपासच राहात आहे. आता आणखी अधिक काळ कापूस घरात साठवून ठेवण्याची स्थिती राहिली नसल्याने शेतकऱ्यांना आता कापूस अनिच्छेने मार्केटमध्ये आणून विकावा लागत आहे.
राळेगाव तालुक्यात आतापर्यंत पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस मार्केट यार्डवरून व्यापारी व सीसीआयने खरेदी केला आहे. आता केवळ खासगी व्यापाऱ्यांचीच खरेदी सुरू आहे. सीसीआयच्या केवळ चार हजार १०० रुपये हमी दराच्या खरेदीमुळे ती खरेदी बंद झाली आहे.
जानेवारीपासून तेजीच्या आशेने कापूस पाच ते सहा हजार रुपये प्रती क्विंटल दराने विकला जाईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा शेतकरी बांधवांमध्ये व्यक्त केली जात होती. पण दिवसामागून दिवस जात असतानाही दरवाढ न झाल्याने आणि आता ऊन कडक होत जात असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. तालुक्यात अजूनही किमान दोन लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे असावा, असा अंदाज आहे.
यावर्षी कापूस व्यवसायातील अनिश्चितता व तेजीमंदीची शक्यता पाहता अनेक लहान मोठ्या परंपरागत कापूस व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीपासून दूर राहणे पसंत केले आहे. अनेकांचे जिनिंग प्रेसिंग मागील एक-दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)