उमरखेड तहसीलदारासमोर इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: August 3, 2014 00:19 IST2014-08-03T00:19:47+5:302014-08-03T00:19:47+5:30

आवश्यक कागदपत्रांसाठी तहसीलदमध्ये वारंवार माराव्या लागणाऱ्या येरझाऱ्यांना कंटाळून एका इसमाने चक्क तहसीलदारांसमोरच अंगावर ब्लेडने असंख्य जखमा करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

In front of Umarkhed Tehsildar, it is a suicide attempt | उमरखेड तहसीलदारासमोर इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

उमरखेड तहसीलदारासमोर इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

उमरखेड (कुपटी) : आवश्यक कागदपत्रांसाठी तहसीलदमध्ये वारंवार माराव्या लागणाऱ्या येरझाऱ्यांना कंटाळून एका इसमाने चक्क तहसीलदारांसमोरच अंगावर ब्लेडने असंख्य जखमा करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तहसील प्रशासनासह शहरातही खळबळ उडाली आहे.
शहरातील गोचर स्वामी वार्डातील रहिवासी भालचंद्र ढोबळे हा सध्या बहिणीच्या नवऱ्याच्या खूनप्रकरणी अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला पॅरोलवर सुटी मिळण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तहसीलमधून काढण्यासाठी त्याचा भाऊ मनोज ढोबळे (५०) गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयात येरझारा मारत होता. अमरावती कारागृह अधीक्षकांचे पत्र उमरखेड तहसीलदारांना प्राप्त झाले होते. त्यानुसार तहसीलने मनोज ढोबळेकडे आवश्यक ते कागदपत्र देणे अपेक्षित होते. परंतु तहसीलदार सचिन शेजाळ हे हेतूपरस्पर आपल्याला त्रास देत असून कागदपत्र देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मनोज ढोबळे याने केला आहे. तहसीलच्या याच कारभाराला कंटाळून शनिवारी दुपारी ४ वाजता तहसीलच्या आवारात तहसीलदारांसमोर मनोजने स्वत:च्या अंगावर ब्लेडने असंंख्य वार करून घेतले. या वेळी तहसील परिसरात असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. ब्लेडने स्वत:वर वार केल्यानंतर मनोज ढोबळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तत्काळ उमरखेड शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तहसीलच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून ही घटना घडल्याची चर्चा शहरात आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. सध्या मनोज ढोबळे याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: In front of Umarkhed Tehsildar, it is a suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.