धनगर बांधवांचा मेंढ्यांसह मोर्चा
By Admin | Updated: August 1, 2014 00:30 IST2014-08-01T00:30:13+5:302014-08-01T00:30:13+5:30
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव मेंढ्यांसह उमरखेड तहसीलवर धडकले. दुपारी १२ वाजता महाराष्ट्र

धनगर बांधवांचा मेंढ्यांसह मोर्चा
उमरखेड तहसील : अनुसूचित जमातीमध्ये समावेशाची मागणी
उमरखेड : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव मेंढ्यांसह उमरखेड तहसीलवर धडकले. दुपारी १२ वाजता महाराष्ट्र धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलाही सहभागी झाल्या होत्या.
धनगर संघर्ष समितीच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी १२ वाजता उमरखेड बाजार समितीपासून मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मेंढ्यांनाही आणण्यात आले होते. त्याच बरोबर महागाव आणि उमरखेड तालुक्यातील महिला पुरुष सहभागी झाले होते. आरक्षण संघर्ष समितीचा धागा हो, उठ धनगरा जागा हो, अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील विविध मार्गावरून हा मोर्चा जात असताना काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यावेळी यादवराव मखळे, अॅड. बाळासाहेब नाईक, वसंतराव चंद्रे, बळवंतराव नाईक, आनंदराव चिकणे यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राजेश लवाणे, रामराव जामकर, उत्तमराव तासके, डॉ. अशोक हिंगाडे, सतीश नाईक, भगवान पंडागळे, मधुकर टेकाळे, पांडुरंग पोहणे, स्वप्नील नाईक, उमरखेडच्या माजी नगराध्यक्ष अर्चना नाईक, चंद्रकला ढोरे, मंदाताई काळसरे, उषा तासके, दुर्गा तासके, ज्योती पाटे, हरणाबाई गोरे, अनिता तासके, वनिता हिंगाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले.
उमरखेडच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा मोर्चा निघाला. शेकडो मेंढरेही सहभागी झाले होते. तालुक्यातील कळमुला येथील सुभाष कवाणे हा परंपरागत वेशात सहभागी झाला होता. २ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येणार असून शासनाने तत्काळ दखल घेतली नाही तर महिलाही रस्त्यावर उतरणार असल्याचे यावेळी उषा तासके यांनी सांगितले. (वार्ताहर)