आर्णी नगरपरिषदेवर मोर्चा
By Admin | Updated: January 29, 2015 23:16 IST2015-01-29T23:16:09+5:302015-01-29T23:16:09+5:30
नगरपरिषदेची स्थापना होवून बराच कालावधी लोटला असून अद्यापही ग्रामपंचायत स्तरावरीलही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. याबाबत अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये रोष आहे.

आर्णी नगरपरिषदेवर मोर्चा
विविध समस्या : मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार
आर्णी : नगरपरिषदेची स्थापना होवून बराच कालावधी लोटला असून अद्यापही ग्रामपंचायत स्तरावरीलही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. याबाबत अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये रोष आहे. आज मात्र नागरिकांचा संताप अनावर झाल्याने नगरपरिषदेवर धडक दिली. परंतु त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीही तेथे कोणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्या खुर्चीला नागरिकांनी हार घालून आपल्या समस्यांचे निवेदन चिपकविले.
आर्णी शहरातील प्रभाग क्र.१ संभाजीनगर हे विविध मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे. या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. पाणीपुरवठ्याची नियमित व्यवस्था नाही. पथदिवे नाही. तसेच मोठ्या प्रमाणात विविध समस्या प्रलंबित आहे. याबाबत वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी नोंदविल्यानंतरही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी गुरुवारी नगरपरिषदेवर धडक दिली. यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्या कक्षात ठिय्या ठोकला आणि त्यांच्या खुर्चीला हारार्पण करून मागण्यांचे निवेदन खुर्चीवर चिटकविले. आंदोलनात पूनम रणमले, आमरीन चव्हाण, सोनू घाटे, शारदा गजलवार, ललिता चव्हाण, माया चव्हाण, उषा माळवे, उषा वाघाडे, वच्छला पारधी, लक्ष्मी पारधी, सीमा पाटील, चंदा गायकर, ताई वानखडे, ताई भगत आदींसह नागरिक सहभागी झाले होते. याबाबत प्रभारी मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्याशी संपर्क साधला असता आपण नव्यानेच प्रभार घेतला असून प्रत्यक्ष शहरात फिरून समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)