स्वातंत्र्य सैनिक मार्ग नामफलकाची दुरवस्था
By Admin | Updated: March 4, 2017 01:00 IST2017-03-04T01:00:32+5:302017-03-04T01:00:32+5:30
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या शिवाजी चौकालगतच्या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक सटवारावजी नाईक असे नामाभिदान करण्यात आले.

स्वातंत्र्य सैनिक मार्ग नामफलकाची दुरवस्था
नगरपरिषदेचे दुर्लक्ष : दहा वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
पुसद : शहराच्या हृदयस्थानी असलेल्या शिवाजी चौकालगतच्या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक सटवारावजी नाईक असे नामाभिदान करण्यात आले. तेथे नगरपरिषदेने नामफलक लावला आहे. मात्र दहा वर्षापासून या फलकाचे अनवारण करण्याचा विसर पडल्याने नामफलकाची दुरावस्था झाली असून नगरपरिषद प्रशासनाने याकडे दर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
दहा वर्षांपूर्वी पुसद नगर पालिकेने शिवाजी चौक लगतच्या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक सटवारावजी नाईक मार्ग असे नाव देऊन नामफलक लावले होते. या नामफलकाचे अनावरण तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे हस्ते करण्याचा नगरपरिषद प्रशासनाचा प्रयत्न होता. परंतु दहा वर्षापासून या फलकाचे उद्घाटन अधांतरी आहे. या नामफलकावर जाहिरातीचे पॉम्पलेट लावून त्याला विद्रूप केल जात आहे. तसेच नामफलकावरील टाईल्स पण उखडली आहेत. त्याचप्रमाणे या नामफलकाखाली दुकानदार, फळविक्रेते व नागरिक कचरासुद्धा टाकतात.
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सटवारावजी नाईक यांचा सहभाग होता. ते काँग्रेसचे सच्चे शिपाई होते. त्यांनी तीन महिने जबलपूरच्या जेलमध्ये कारावास भोगला होता. या जेलमध्ये त्यांच्या सोबत स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी होते. सटवारावजी नाईक हे त्याकाळी वऱ्हाड काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. अशा महान स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने पुसद नगर पालिकेने शहराच्या मधयभागी असलेल्या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक सटवारावजी नाईक मार्ग असे नामाविधान केले असले तरी या नामफलकाची आज पूर्णत: दुरावस्था झाली आहे. या मार्गाने शहरातील प्रत्येक नागरिक जातात. त्यांचे लक्ष या फलकाकडे जाते. परंतु कुणीही या फलकाच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेत नाही. नगरपरिषदेचही अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)