शेतकऱ्यांसाठी मोफत प्रवास सुविधा
By Admin | Updated: November 9, 2016 00:24 IST2016-11-09T00:24:44+5:302016-11-09T00:24:44+5:30
शेतमाल विकून घरी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशावर चोरट्यांच्या हमखास नजरा असतात.

शेतकऱ्यांसाठी मोफत प्रवास सुविधा
बाजार समिती ते बसस्थानक : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम
यवतमाळ : शेतमाल विकून घरी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशावर चोरट्यांच्या हमखास नजरा असतात. यातून लुटमारीचे प्रकार घडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी यवतमाळ बाजार समितीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती ते बसस्थानक अशी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नवनियुक्त संचालक मंडळाने या संदर्भातील प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविला आहे.
यवतमाळ बाजार समितीमध्ये नवनियुक्त संचालकांनी विविध उपाय योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलले आहे. याठिकाणी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना गावी जाताना सुरक्षा मिळावी म्हणून वाहनाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. याकरीता बाजार समिती दोन वाहनाची खरेदी करणार आहे. यासंदर्भात पणन महासंघाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच मोफत वाहन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
शेतमाल विक्रीसाठी आणतांना अनेक वेळा उशीर झाल्याने शेतकऱ्यांना उपाशी झोपावे लागते. माफक दरात शेतकऱ्यांना भोजन मिळावे म्हणून बचत गटाच्या माध्यमातून झुनका भाकर केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविला आहे. पिण्याचे शुध्द पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून फिल्टर प्लान्ट या ठिकाणी बसविला जाणार आहे. प्रसाधनगृह उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. कामाला गती मिळावी आणि शेतमालास अधिक दर मिळावा म्हणून नवीन व्यापाऱ्यांना आमंत्रण दिले जाणार आहे.
बैलबाजार आणि भाजी मंडीसाठी विशेष नियोजन केले जात आहे. भाजी मंडीतील दुकानासाठी आकारलेले दर कमी करण्यात येणार आहेत. अनामत रक्कमही कमी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही अनामत रक्कम एक लाख रूपयावरून ७५ हजार रूपये करण्यात आली आहे. बाजार समितीत विविध सुविधा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)
अकोलाबाजार येथे दोन आठवड्यात खरेदी
यवतमाळ बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या अकोलाबाजार केंद्र तीन वर्षांपासून बंद आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी अडचणी मांडल्या. पिण्याचे पाणी, काटा आणि अस्वच्छता हे प्रमुख प्रश्न या ठिकाणी आहेत. १० ते १५ दिवसात हे प्रश्न सुटतील खरेदी नव्याने सुरू होईल. अशी माहिती ढोक यांनी ‘लोकमत’ला दिली.