आरटीओ कार्यालयाच्या एजंटमध्ये ‘फ्री स्टाईल’

By Admin | Updated: January 23, 2015 00:13 IST2015-01-23T00:13:54+5:302015-01-23T00:13:54+5:30

परिवहन आयुक्तांनी वर्षानुवर्षे आरटीओ कार्यालयातील कामकाज सांभाळणारे खासगी एजंट हद्दपार केले. त्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे.

'Free Style' in RTO Office Agent | आरटीओ कार्यालयाच्या एजंटमध्ये ‘फ्री स्टाईल’

आरटीओ कार्यालयाच्या एजंटमध्ये ‘फ्री स्टाईल’

यवतमाळ : परिवहन आयुक्तांनी वर्षानुवर्षे आरटीओ कार्यालयातील कामकाज सांभाळणारे खासगी एजंट हद्दपार केले. त्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. असे असताना गुरूवारी सकाळी क्षुल्लक कारणावरून एजंटमध्येच वाद होऊन ‘फ्रीस्टाईल’ झाली. अखेर प्रकरण शहर ठाण्यात पोहोचले. ऐनवेळी दोन्ही व्यक्तींची समजूत घालण्यात आल्याने पोलीस कारवाई टळली.
वर्षानुवर्षे येथील आरटीओ कार्यालयात काही स्थानिक बेरोजगार खासगी एजंट म्हणून कार्यालयात होणारी कामे करीत होते. मात्र परिवहन आयुक्तांच्या एका आदेशाने त्यांचा रोजगार बुडाला. त्यामुळे या एजंटांनी परिवहन आयुक्तांच्या आदेशाचे पालन करीत येथील आरटीओ कार्यालयात कामासाठी येणाऱ्या व्यक्तींना कुठलीही मदत करायची नाही असा निर्णय एकत्रीतपणे घेतला. येथील कार्यालयात तोकडे मनुष्यबळ असल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे कामासाठी येणाऱ्या व्यक्तींना एजंटांकडेच धाव घ्यावी लागते. अन्यथा एका दिवसात तरी त्यांचे काम होणे शक्य नाही. असे असताना आणि एजंटांनी कुठलेही काम करायचे नाही असा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला एका ड्रायव्हिंगस्कूल चालक एजंटने गुरूवारी तडा दिला. कामासाठी आलेल्या व्यक्तींची कामे त्याने करून दिली. ही बाब लक्षात येताच इतर एजंट संतप्त झाले. सर्व एजंटांचे नेतृत्व करणाऱ्यात आणि त्या ड्रायव्हिंग स्कूल चालक एजंटमध्ये हमरीतुमरी झाली.
वाद वाढत गेल्याने त्यांच्यात फ्रीस्टाईल झाली. संतापाच्या भरात प्रकरण वाढत जाऊन ते शहर ठाण्यात पोहोचले. यावेळी इतर एजंटांनी मध्यस्ती केल्याने प्रकरण निवळले. मात्र परिवहन आयुक्तांनी हे आदेश मागे न घेतल्यास याहीपेक्षा गंभीर घटना भविष्यात उद्भविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)
जनसामान्यांना धरले वेठीस
स्थानिक आरटीओ कार्यालयात स्टेशनरी नाही. विहीत नमुनेही उपलब्ध नाहीत. परवाने आॅनलाईन केले असले तरी बरीच कामे आजही कागदी दस्तावेजावरच होतात. असे असताना आरटीओ कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना एजंटकडे धाव घ्यावीच लागते. कार्यालयच परिपूर्ण नसताना परिवहन आयुक्तांनी एजंट हद्दपारीचा आदेश काढला. या आदेशाचे पालन येथील एजंट करीत आहेत. त्यामुळे कितीही विनवन्या केल्या तरी कुणी नमुना फार्मही झेरॉक्ससाठी द्यायला तयार नाही. अर्ज भरणेही सोपे काम नाही. कुठे कुठली माहिती भरायची हे एजंटांना चांगले अवगत आहे. सामान्य माणसाला ते शक्य होत नाही. आरटीओ कार्यालयात उणिवा अन् एजंटांचा बहिष्कार अशा दुहेरी कैचीत आरटीओ कार्यालयात कामासाठी येणारे नागरिक सापडले असल्याचे दिसून येते.

Web Title: 'Free Style' in RTO Office Agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.