विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: December 6, 2014 22:56 IST2014-12-06T22:56:09+5:302014-12-06T22:56:09+5:30
अतिरिक्त ठरलेल्या ९५० आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आदिवासी अपर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार प्रवेशासह शिष्यवृत्ती, पुस्तके आणि प्रशिक्षणाचाही प्रश्न

विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा
आंदोलनाला यश : अपर आयुक्तांची हिरवी झेंडी
यवतमाळ : अतिरिक्त ठरलेल्या ९५० आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आदिवासी अपर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार प्रवेशासह शिष्यवृत्ती, पुस्तके आणि प्रशिक्षणाचाही प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली.
जिल्ह्यात असलेल्या १९ वसतिगृहाची निवास क्षमता २३४५ विद्यार्थ्यांची आहे. या ठिकाणी २२३५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. यानंतरही एक हजारावर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलेल्या या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. शनिवारी प्रकल्प अधिकारी प्रशांत रुमाले यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. त्यांनी अमरावती अपर आयुक्तांशी संपर्क केला. त्यांनी ९५० विद्यार्थ्यांच्या वसतिगृह अतिरिक्त प्रवेशास मंजुरी दिली.
७५० विद्यार्थ्यांना यवतमाळात प्रवेश मिळणार आहे. राळेगाव, पुसद आणि दारव्हा तालुक्यातील वसतिगृहातही अतिरिक्त प्रवेशास मंजूरी देण्यात आली.
यासोबत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, पुस्तके आणि विविध प्रशिक्षण या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुडमेथे, नागेश कुमरे, नीलेश पंधरे, सनी कुडमेथे, महेश गेडाम, कैलास वड्डे, मंगेश शेंडे, आशिष मडकाम आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विविध भागातून विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश मिळेल या आशेवर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. परंतु वसतिगृहात प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले होते. आता आयुक्तांनी प्रवेशाचा तिढा सोडविल्यामुळे त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. नवीन सत्र सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही पुस्तके मिळाली नाही. ही व्यवस्थाही तत्काळ करण्याची मागणी आहे. (शहर वार्ताहर)