६५० कुटुंबांना मोफत बियाणे व खते

By Admin | Updated: July 19, 2015 02:38 IST2015-07-19T02:38:56+5:302015-07-19T02:38:56+5:30

दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त ६५० कुटुंबांना शिवसेनेतर्फे मोफत बियाणे आणि खताचे वाटप करण्यात आले.

Free seed and fertilizers to 650 families | ६५० कुटुंबांना मोफत बियाणे व खते

६५० कुटुंबांना मोफत बियाणे व खते

शिवसेनेचा उपक्रम : दिवाकर रावते, संजय राठोड यांची उपस्थिती
यवतमाळ : दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त ६५० कुटुंबांना शिवसेनेतर्फे मोफत बियाणे आणि खताचे वाटप करण्यात आले. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री संजय राठोड आदींच्या उपस्थितीत दारव्हा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी ना. रावते म्हणाले, पावसाअभावी राज्यातील शेतकरी भीषण संकटातून जात आहेत. अनेक ठिकाणी पेरणी उलटली, पिके करपत आहेत, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा स्थितीत कोणाची तरी भक्कम साथ शेतकऱ्यांना हवी आहे. ‘पेरते व्हा’ या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना त्यांच्या सोबत आहे, हेच सांगायला मी आज येथे आलो आहे. प्रथम शेतकरी हित ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेला अनुसरूनच राज्यातील शिवसैनिक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी परिश्रम घेत असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री संजय राठोड म्हणाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेतीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचा उपक्रम जिल्ह्यात १ जुलैपासून शिवसेनेतर्फे सुरू आहे. आतापर्यंत ६० च्यावर शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी पेरणी करून दिली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारून कुटुंबाला उघड्यावर पाडू नये, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमात मंत्रीव्दयांच्या हस्ते लक्ष्मी धुरट, माया चव्हाण, कमला राठोड, अनंत राऊत, कमला भोकरे, सतवा चव्हाण, शांता शेरे आदी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली. तूर, सोयाबीन आणि खताच्या प्रत्येकी ६५० बॅग वाटप करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, प्रवीण शिंदे, अरविंद गादेवार, उमाकांत पापीनवार, राजेंद्र साकला, तालुका प्रमुख मनोज सिंगी, राजकुमार वानखडे, गजानन भोकरे, शहर प्रमुख सुधीर दातीर, संजय चोपडे, रवींद्र भारती, मनोज ढगले, पंडित राठोड, अजय गाडगे, महिला आघाडी प्रमुख लता चंदेल, जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले, पंचायत समिती सदस्य माणिक मेश्राम, महिला आघाडी जयश्री मिरासे, साधना वाणी, आशा डोंगरे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख राजू दुधे, गजेंद्र चव्हाण, धनंजय सारखे, रवी तरटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Free seed and fertilizers to 650 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.