सिकलसेल रुग्णांना मोफत औषधी
By Admin | Updated: October 28, 2015 02:44 IST2015-10-28T02:44:13+5:302015-10-28T02:44:13+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या सिकलसेलग्रस्त रुग्णांना रुग्ण कल्याण समितीमार्फत मोफत औषधी देण्यात येईल,

सिकलसेल रुग्णांना मोफत औषधी
श्यामकुमार शिंदे : म्हसोला येथे रुग्ण कल्याण समितीची सभा
आर्णी : प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या सिकलसेलग्रस्त रुग्णांना रुग्ण कल्याण समितीमार्फत मोफत औषधी देण्यात येईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामकुमार शिंदे यांनी दिली.
म्हसोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णकल्याण कार्यकारी समितीची सभा पार पडली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामकुमार शिंदे मार्गदर्शन करीत होते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी वीज भाराच्या विद्युत पुरवठ्यामुळे बऱ्याच दिवसांपासून पाण्याची समस्या होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना व रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. तसेच येथील शस्त्रक्रियागृह अद्यापही पाण्याच्या समस्येमुळे सुरू करणे शक्य झालेले नाही. कमी भाराच्या विद्युत पुरवठ्यावर उपाययोजना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर विद्युत पॅनल आवश्यक आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वीज पुरवठा व पाणीपुरवठा उपलब्ध राहण्याच्या अनुषंगाने रुग्णकल्याण समितीमध्ये सोलर विद्युत पॅनलच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व यवतमाळ मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच मोफत औषधीचा ठरावही घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.बोरकर यांनी सादर केली. परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून जनतेस योग्य आरोग्यसेवा पुरविण्याची सूचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शिंदे यांनी केली. रुग्णांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेचा उपयोग करून घ्यावा. तसेच सिकलसेलग्रस्त रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत औषधी घ्यावी, असे आवाहन डॉ.शिंदे यांनी केले.
रुग्ण कल्याण समितीचे सदस्य गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, म्हसोला येथील सरपंच संगीता राठोड, उषा धवने, बालविकास प्रकल्प अधिकारी आदी या सभेला उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)