भारी येथे नि:शुल्क कर्करोग तपासणी व उपचार शिबिर
By Admin | Updated: March 13, 2015 02:28 IST2015-03-13T02:28:42+5:302015-03-13T02:28:42+5:30
लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार १८ मार्च रोजी सांसद आदर्श ग्राम योजनेतील खासदार विजय दर्डा यांचे दत्तक ग्राम भारी...

भारी येथे नि:शुल्क कर्करोग तपासणी व उपचार शिबिर
यवतमाळ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार १८ मार्च रोजी सांसद आदर्श ग्राम योजनेतील खासदार विजय दर्डा यांचे दत्तक ग्राम भारी येथे नि:शुल्क कर्करोग तपासणी व उपचार शिबिर आणि ‘कॅन्सर होऊ शकतो कॅन्सल’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवार १८ मार्च रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. या शिबिरात प्रसिद्ध सेंट्रल इंडिया कॅन्सर रिसर्च इन्स्टीट्युटचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. अजय मेहता व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुचित्रा मेहता मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत मीडिया प्रा.लि. च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड़ राठोड, सरपंच वासुदेव गाडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
लोकमत सखी मंचच्या माध्यमातून ज्योत्स्ना दर्डा यांनी महिला सक्षमीकरणाचे स्वप्न पाहिले. त्यांनी आयुष्यभर सेवाभावी कार्य केले. त्याच अनुषंगाने यवतमाळलगतच्या भारी येथे नि:शुल्क कर्करोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हल्ली महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आजाराबाबत फारशी जनजागृती नाही, शिवाय ग्रामीण भागात या आजारावरील उपचाराचा अभाव आहे. या आजाराबाबत ग्रामीण भागातील महिलांना योग्य माहिती मिळावी, त्यांच्यात आजार व उपचाराबाबत जनजागृती व्हावी यासाठी सदर शिबिराचे आयोजन ग्रामीण भागात करण्यात आले आहे. कॅन्सर कसा ओळखावा, कोणत्या टेस्ट कराव्यात, कॅन्सर
कुणालाही होऊ शकतो का, संभाव्य लक्षणे कोणती, कुठली काळजी घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहेत. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांची तज्ज्ञांव्दारे नि:शुल्क कर्करोग तपासणी केली जाणार आहे.
या शिबिराच्या अधिक माहिती व नोंदणीसाठी प्रवीण गुल्हाणे (९८२३५६४९६५), गजानन ठोंबरे (९६५७०००६५९), ज्योत्स्ना मेश्राम (९७६५६२२५६१), कविता जोशी (९८८१४११७०७) यांच्याशी संपर्क करावा. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, भारी
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे, जवाहर विद्यालय भारी, वसंतराव नाईक शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष सहकार्य लाभत आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)