राळेगाव मतदारसंघात चौरंगी लढत
By Admin | Updated: October 11, 2014 02:20 IST2014-10-11T02:20:55+5:302014-10-11T02:20:55+5:30
राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे.

राळेगाव मतदारसंघात चौरंगी लढत
राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यांचे लक्ष केवळ राळेगाववरच राहिले. बाभूळगाव आणि कळंब हे दोन तालुके आणि करंजी सर्कलवर त्यांची कृपादृष्टी राहिली नाही. या बाबी त्यांच्यासाठी घातक सांगितल्या जात असल्यातरी मतदारसंघातील लोकांशी सततचा संपर्क, दादा गटाचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि विरोधकांना छुप्या पध्दतीने मदत करणाऱ्यांची मौन भूमिका या बाबी त्यांच्यासाठी जमेच्या मानल्या जातात. कळंब तालुक्यातून त्यांना किती प्रतिसाद मिळतो यावर बरेच काही अवलंबून आहे.
भाजपाचे उमेदवार प्रा.डॉ. अशोक उईके हे चौथ्यांदा प्रा.पुरके यांच्याशी लढत देत आहे. मात्र ते गावागावात पक्षाचे संघटन उभे करण्यात यशस्वी झाले नाही. कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे वाणवा आहे. संस्था ताब्यात मिळविण्यात त्यांना यश आले नाही. तथापि पक्षाची परंपरागत मते आणि मोदी लाट या बाबी त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद एखाद्या तगड्या उमेदवाराला पराभूत करण्याइतपत नक्कीच होती. त्याचा अनुभवही काही निवडणुकांमध्ये आला आहे. परंतु यावेळचे चित्र वेगळे आहे. एक गट काँग्रेसमध्ये गेला तर विशेषत: कळंब तालुक्यातील लोकांनी कुुठे शब्द टाकणे सुुुरू केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद धुर्वे यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
जमादार उत्तम मडावी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांचा या मतदारसंघात फारसा संपर्क राहिला नाही. निवडणूक प्रचार करताना त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. शिवसैनिकांची साथ हीच त्यांच्यासाठी तेवढी जमेची बाजू आहे. याशिवाय इतर उमेदवारही आपलीच बाजू भक्कम असल्याचे सांगत मतांचा जोगवा मागत आहे.
राळेगाव, कळंब, बाभूळगाव या पूर्ण तीन तालुक्यातील आणि रुंझा महसूल सर्कलमधील ४२३ गावातील साडेतीन लाखावर नागरिक या मतदारसंघात आहे. चार महत्त्वपूर्ण पक्षांचा प्रभाव मतदारसंघात थोड्याफार फरकाने सारखाच आहे. परिवर्तन हवे, नको, विकास झाला, नाही झाला, पुरकेंची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द, बेंबळा प्रकल्प, शेतमालाला दामसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, पंतप्रधान मोदींची शैली आदी विविध मुद्यांवर ही निवडणूक वेगळीच रंगत घेऊ लागली आहे.