चार हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
By Admin | Updated: March 21, 2015 02:18 IST2015-03-21T02:18:41+5:302015-03-21T02:18:41+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पुसद ...

चार हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
पुसद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पुसद तालुक्यातून ४ हजार १८८ विद्यार्थी २२ मार्च रोजी ३५ केंद्रावर परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्याचा उपाय म्हणून यंदा प्रथमच सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी दोन ते चार दिवस आधीच प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जात होत्या. ही पद्धत यंदा प्रथमच बदलण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
पुसद तालुक्यात गटशिक्षणाधिकारी ज्योती पांडे व केंद्र प्रमुख संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शहरी व ग्रामीण असे मिळून ३५ परीक्षा केंद्र आहेत. त्यात वर्ग १ ते ४ पर्यंतच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी ग्रामीण भागात घाटोडी, चोंढी, जांबबाजार, पारवा, फेट्रा, रोहडा, बेलोरा, माणिकडोह, शेलू (बु.), गौळ, कारखेडा, काकडदाती, सावरगाव (बंगला), चिखली (कॅम्प) तर शहरात जि.प. कन्या शाळा, लोकहित विद्यालय, श्रीराम आसेगावकर, शिवाजी शाळा, जनता शिक्षण प्रसारक मंडळ या पाच शाळा असे एकूण २१ परीक्षा केंद्र निर्धारित केले आहेत.
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शहरात को.दौ., एम.पी.एन. नगर परिषद विश्वनाथसिंह बयास विद्यालय या शाळांचा समावेश आहे तर ग्रामीण भागात श्रीरामपूर शेलू, जांबबाजार, गौळ (बु.), शेंबाळपिंपरी, सावरगाव (बंगला), हुडी, गहुली या परीक्षा केंद्रावर २२ मार्च रोजी तालुक्यातील ४ हजार १८८ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची अशी माहिती विस्तार अधिकारी (शिक्षण) संजय कांबळे यांनी दिली. तालुक्याती परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज आहेत. (तालुका प्रतिनिधी)