चार हजार अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 22, 2014 23:24 IST2014-10-22T23:24:40+5:302014-10-22T23:24:40+5:30
बालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

चार हजार अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात
किशोर वंजारी - नेर
बालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले त्यांचे मानधन आजतागायत प्रशासनाने दिले नाही. अथवा कुठल्याही लोकप्रतिनिधीने त्यासाठी प्रयत्न केलेले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर ही वेळ येवून ठेपली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात चार हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनिस आहेत. त्यांच्या मेहनतीनेच जिल्ह्यातील अंगणवाड्या सुरळीत सुरू आहे. अल्प मानधनावर गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडीसेविका आणि मदतनिस कार्यरत आहे. त्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका या घटस्फोटीत आणि दारिद्र्यरेषेखाली मोडणाऱ्या कुटुंबातील आहे. हातावर आणणे आणि पानावर खाने अशी त्यांची परिस्थिती. त्यातही प्रशासनाने गेल्या अनेक वर्षात मानधनात समाधानकारक वाढ केली नाही. असे असतानाही मानधनही सुरळीत दिले जात नाही. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१४ या तीन महिन्यांचे मानधन अद्यापही अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळाले नाही. दिवाळी हा सण अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. असे असताना प्रशासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. त्यामुळेच अग्रीम तर सोडा साधे मानधनही दिवाळी सणाच्या तोंडावर मिळालेले नाही. मानधन तत्काळ मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष विजया सांगळे, सचिव अनिता कुळकर्णी यांनी दिला आहे. मानधनाचा हा प्रश्न मार्गी लागतो का याकडे लक्ष लागले आहे.