चार नवे पोलीस ठाणे लवकरच
By Admin | Updated: August 14, 2014 23:56 IST2014-08-14T23:56:16+5:302014-08-14T23:56:16+5:30
यवतमाळ जिल्ह्यात मोहदा, वणी ग्रामीण, लोहारा आणि वसंतनगर (पुसद) या चार नवीन पोलीस ठाण्यांना शासनाने मंजूरी दिली असून हे ठाणे लवकरच अस्तित्वात येतील, अशी माहिती

चार नवे पोलीस ठाणे लवकरच
पांढरकवडा : यवतमाळ जिल्ह्यात मोहदा, वणी ग्रामीण, लोहारा आणि वसंतनगर (पुसद) या चार नवीन पोलीस ठाण्यांना शासनाने मंजूरी दिली असून हे ठाणे लवकरच अस्तित्वात येतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली.
येथील पोलीस कर्मचारी वसाहतीच्या इमारत लोकार्पणानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते. ना. पाटील पुढे म्हणाले, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर मोठा असून कित्येक वर्षांपासून पोलीस ठाण्यांची संख्या वाढली नसल्याने पोलिसांवर ताण येत होता. नव्या ठाण्यांमुळे हा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. आतापर्यंत आम्ही ४० टक्के पोलिसांनाच घरे देवू शकलो. अद्याप ६० टक्के कर्मचारी घरांपासून वंचित आहेत. त्यासाठी १२ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सर्व कामे बाजूला ठेवून आधी पोलिसांसाठी घरे बांधावी, असा विचार येतो. मात्र दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कुपोषण या गोष्टींनाही प्राधान्य द्यावे लागत असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
ना. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात असलेला नक्षलवाद संपुष्टात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादही ५० टक्के कमी झाला. आपण आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. सर्वात जास्त महिलांची संख्या असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. गेल्या चार वर्षात गडचिरोलीमध्ये अडीच हजार पोलिसांची भरती करण्यात आली असून त्यामध्ये ८०० मुलींचा समावेश आहे. अतिरेक्यांच्या कारवाया संपुष्टात आणण्यासाठी मुंबई फोर्स वनसारख्या दलाची निर्मिती करण्यात आली आहे. अद्ययावत शस्त्रसामग्रीने सज्ज असलेले दल कितीही अतिरेकी मुंबईत घुसले तरी त्यांचा सामना करण्यास सज्ज असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. यावेळी ना. आर.आर. पाटील यांनी अवैध दारू विक्री, पोलिसांना माहीत असलेले अवैध धंदे, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान, पोलिसांची वेतनवाढ आदी मुद्यांनाही हात घातला.
यावेळी ना. पाटील यांनी संपूर्ण वसाहतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कंत्राटदार हरिश पटेल, आर्किटेक्ट खंडारे यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ना. शिवाजीराव मोघे, नगराध्यक्ष शंकर बडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाला आमदार प्रकाश गजभिये, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, आशीष मानकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन येथील ठाणेदार अशोक बागुल यांनी केले.
(तालुका प्रतिनिधी)