चार नगराध्यक्ष बिनविरोध
By Admin | Updated: July 16, 2014 00:26 IST2014-07-16T00:26:38+5:302014-07-16T00:26:38+5:30
केवळ एकच नामांकन दाखल झाल्याने जिल्ह्यात चार नगराध्यक्ष बिनविरोध झाले असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शेष आहे. अन्य चार नगरपरिषदांसाठी १९ जुलै रोजी निवडणूक घेतली जाणार आहे.

चार नगराध्यक्ष बिनविरोध
घोषणेची औपचारिकता बाकी : यवतमाळ, घाटंजीत राष्ट्रवादीचे वर्चस्व
यवतमाळ : केवळ एकच नामांकन दाखल झाल्याने जिल्ह्यात चार नगराध्यक्ष बिनविरोध झाले असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शेष आहे. अन्य चार नगरपरिषदांसाठी १९ जुलै रोजी निवडणूक घेतली जाणार आहे.
यवतमाळ, घाटंजी, दिग्रस आणि वणी या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाचे एकच उमेदवारी अर्ज आल्याने बिनविरोध निवडले गेले. तर पुसद, उमरखेड, आर्णी, दारव्हा या नगरपरिषदांमध्ये एका पेक्षा अनेक अर्ज आल्याने १९ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. यवतमाळमध्ये केवळ सहा सदस्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व स्थापन केले. येथे नगराध्यक्ष म्हणून सुभाष राय बिनविरोध निवडून आले. घाटंजीमध्ये राष्ट्रवादीच्या चंद्रलेखा रामटेके, दिग्रसमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या सरिता धुर्वे तर वणीमध्ये सत्ताधारी आघाडीच्या अपक्ष उमेदवार करूणा कांबळे नगराध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आल्या. वणीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र मनसेच्या प्रिया लभाणे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला. त्या विरोधात अपिल केले जाणार आहे. अन्य चार नगरपरिषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसने जोरदार हालचाली चालविल्या आहे. पुसदमध्ये आतापर्यंत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसशी घरठाव केला आहे.
यवतमाळ नगरपरिषदेत सातत्याने बदलणाऱ्या राजकीय स्थितीवर राष्ट्रवादीने यशस्वी मात केली. नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि बसपाच्या सदस्यांची शहर विकास आघाडी स्थापन आहे. या आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाच्या गोटातून झाला. गेली अडीच वर्ष पक्ष विरोधी कारवाया करणारे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘हात’ देणारे भाजपाचे नगराध्यक्ष योगेश गढिया व त्यांचे समर्थक नगरसेवक अचानक एकजुटीचे प्रदर्शन करीत एकत्र आले होते. या एकजुटीआड भाजपा नेत्याची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अखेर दोन दिवस चाललेल्या या घडामोडीतून मार्ग काढत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदावरचा दावा कायम ठेवला. राष्ट्रवादीने आवश्यक संख्याबळ जुळविल्याने भाजपाची कोंडी झाली.
नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया १९ जुलै रोजी होणार असली तरी स्पर्धक उमेदवारच नसल्याने ही प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरणार आहे. त्याच दिवशी नगर उपाध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी नेमका कोण बाजी मारतो, हे वेळच सांगणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)