बेंबळाचे चार कोटी बांधकामच्या तिजोरीतच

By Admin | Updated: December 15, 2015 04:30 IST2015-12-15T04:30:53+5:302015-12-15T04:30:53+5:30

पुलाच्या बांधकामासाठी बेंबळा कालवे विभागाकडून घेतलेले चार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत पडून

The four-million-strong building of the Bengla dam project | बेंबळाचे चार कोटी बांधकामच्या तिजोरीतच

बेंबळाचे चार कोटी बांधकामच्या तिजोरीतच

विलास गावंडे ल्ल यवतमाळ
पुलाच्या बांधकामासाठी बेंबळा कालवे विभागाकडून घेतलेले चार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत पडून आहे. गेली एक वर्षापासून कामाला सुरुवातच करण्यात आली नाही, तर दुसरीकडे सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचन प्रभावित झाले आहे. वारंवार तोंडी सूचना आणि पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभाग जुमानत नाही. त्यामुळे बेंबळा कालवे विभागाने बांधकाम विभागाला रक्कम परत मागितल्याची माहिती आहे.
बेंबळा प्रकल्प पूर्ण होऊन सात वर्षांपूर्वीच सिंचनासाठी मोकळा करून देण्यात आला आहे. जवळपास १६५ किलोमीटर कालव्यांची निर्मिती करून चार तालुक्यातील गावांना सिंचनासाठी पाणी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र या कामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा आलेख सातत्याने वाढत आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाचा असहकारही सुरू आहे. कालवा मार्गात येणाऱ्या रस्त्यांवर पुलाची उभारणी करण्यासाठी बेंबळा कालवे विभागाने गेली एक वर्षात बांधकाम विभागाला ३ कोटी ९० लाख रुपये दिले आहे. जानेवारी, मार्च आणि सप्टेंबर २०१५ अशा तीन टप्प्यात निधी दिला जावूनही बांधकाम विभागाने अजूनही कामाला सुरूवात केली नाही. कामांना विलंब होत असल्याने कामांची किंमत सातत्याने वाढत आहे. लाखांचे काम कोटींवर पोहोचले आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या इस्टिमेटनुसार निधी देण्यात आला. यानंतरही कामे सुरू करण्यात कोणत्या अडचणी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पुलाची सर्व कामे मुख्य कालवा मार्गावरील आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पांढरकवडा कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

मागणीनुसार पुरविला निधी
४मुख्य कालवा आणि वितरण प्रणालीतील प्रमुख जिल्हा मार्गावर पुलांच्या कामाला अजूनही हात लागलेला नाही. दहेगाव-कुंभा रस्ता, कोपरी-अंतरगाव मार्ग, वडकी-खैरी-करणवाडी, वाढोणाबाजार-आठमुर्डी, वाढोणाबाजार-वेडशी, वाढोणाबाजार-वडकी, वडकी-राळेगाव, राळेगाव-वाढोणाबाजार-वडकी, सावंगी-येवती या रस्त्यांवर पूल उभारणीसाठी बांधकाम विभागाला निधी देण्यात आला आहे. मात्र प्रत्येक कामासाठी आवश्यक तेवढा आणि मागणीनुसार निधी देण्यात आला. कामाला केव्हा सुरुवात होणार याची प्रतीक्षा बेंबळा कालवे विभागाला आहे.

एका पुलाअभावी सात हजार हेक्टरचे सिंचन अडले
दहेगाव-कुंभा या प्रमुख जिल्हा मार्गावर पूल नसल्याने सुमारे ७ हजार २३८ हेक्टर क्षेत्रातील सिंचन थांबले आहे. या कामासाठी १ कोटी १० लाख ४० हजार रुपये १३ जानेवारी २०१५ रोजी सार्वजनिक बांधकामच्या पांढरकवडा विभागाला निधी देण्यात आला. सिंचनासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरू असताना बांधकाम विभागाची दिरंगाई यात खोडा ठरत आहे.

Web Title: The four-million-strong building of the Bengla dam project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.