चौपदरी रस्ता ठरला कर्दनकाळ
By Admin | Updated: June 19, 2014 00:18 IST2014-06-19T00:18:21+5:302014-06-19T00:18:21+5:30
वणी-पडोली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बांधकाम कंपनीतर्फे संथगतीने सुरू आहे. या मार्गाच्या बांधकामामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाल्या असल्या, तरी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांपुढे

चौपदरी रस्ता ठरला कर्दनकाळ
शेतात जाणे अवघड : जागोजागी साचले खड्डे, बियाणे-खत नेणे झाले कठीण
वणी : वणी-पडोली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बांधकाम कंपनीतर्फे संथगतीने सुरू आहे. या मार्गाच्या बांधकामामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाल्या असल्या, तरी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़
करंजी-वणी-घुग्गुस-चंद्रपूर या राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे़ करंजी ते वणी हा मार्ग तीन पदरी डांबरीकरणाचा केला जात आहे, तर वणी ते घुग्गुस हा भाग चौपदरी सिमेंट काँक्रीटचा बनवला जात आहे़ या मार्गाची उंची जमिनीपासून चार-पाच फूट वाढविण्यात आली आहे़ त्यामुळे शेतातील पाणी ठिकठिकाणी अडविले गेले आहेत़ रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या काढून पाण्याला वाट करून देणे आवश्यक होते़ मात्र रस्ता बांधकाम कंपनीने याकडे दुर्लक्ष केले़ परिणामी शेतात पाणी साचून पीक पाण्याखाली सडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ पाणी साचलेला शेतातील भाग शेतीसाठी निरूपयोगी ठरत आहे़
अनेक गावेही या रस्त्यालगत आहे़ लालगुडा-चारगावचौकी, शेलू, पुनवट या गावाला लागूनच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे़ या गावांजवळ नाल्या खोदण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे़ आता पावसाळ्यात नाल्यातील पाणी लगतच्या घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे़ ही बाब पुनवट येथील गावकऱ्यांनी सचित्र निवेदनाद्वारे बांधकाम विभाग व प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र कंपनीने त्याची अजूनही दखल घेतली नाही़ तसेच रस्त्याच्या मधोमध दुभाजक बांधण्यात आले आहे़ त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना बैलगाडी व औत नेता येत नाही़
आता खरीपाच्या पेरणीची वेळ आली आहे़ शेतकऱ्यांना शेतात बियाणे, खते न्यावी लागणार आहे़ तथापि रस्ता उंच झाल्याने बियाणे, खत कोठून आणि कसे न्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांना आता पाच-सहा किलोमीटरचा फेरा मारून बैलगाडी विरूध्द मार्गाने शेतात न्यावी लागणार आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे़ मागीलवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. बांधकाम विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्याची गरज आहे. तसेच रस्ता बांधकाम कंपनीला रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या काढण्यास भाग पाडावे आणि रस्ता पार करण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)