नागपूरच्या युवकाला चार लाखांनी फसविले
By Admin | Updated: July 9, 2015 02:32 IST2015-07-09T02:32:36+5:302015-07-09T02:32:36+5:30
चमत्कार करून रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाला चार लाख रुपयांनी फसविले.

नागपूरच्या युवकाला चार लाखांनी फसविले
तिप्पटीचे आमिष : मेटीखेडा मार्गावरील घटना
अकोलाबाजार : चमत्कार करून रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाला चार लाख रुपयांनी फसविले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता मेटीखेडा-पहूर (इजारा) मार्गावर घडली. नितीन मनोहर बेलखेडे (२८) रा.नवीन सुभेदार ले-आऊट, नागपूर असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.
वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मेटीखेडा-पहूर या रस्त्याच्या कडेला ओंकारनगर, नागपूर येथील मपचे नामक व्यक्तीसह बन्सोड ऊर्फ मतीन, बंडू मारोती जुनगरे (५०) रा.डेहणकर ले-आऊट, यवतमाळ आणि एका अज्ञात महिलेने नितीन बेलखेडे याला बोलाविले. रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून त्याला सदर चार जणांनी फसविले.
या चारही जणांनी मेटीखेडा-पहूर रस्त्याच्या कडेला पूजा मांडली. त्याच्याजवळ असलेले चार लाख रुपये घेतले. चारचे बारा लाख रुपये होत असल्याचे भासविल्याने रक्कम नितीनने या चार लोकांकडे सुपूर्द केली. मात्र आपली फसगत झाल्याचे त्याला लक्षात आले. झाला प्रकार त्याने वडगाव जंगल पोलीस ठाण्यात तक्रार देवून मांडला. प्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदार गोपाल भारती करीत आहे. (वार्ताहर)
अनेक प्रश्न अनुत्तरित
नागपूरचा युवक यवतमाळच्या व्यक्तींशी कसा संपर्कात आला, त्याच्या जवळच एवढी मोठी रक्कम एकाच वेळी कशी आली, त्याने या लोकांवर विश्वास कसा ठेवला आदी अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.