नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांनी गंडविले
By Admin | Updated: October 9, 2015 00:13 IST2015-10-09T00:13:30+5:302015-10-09T00:13:30+5:30
एका बेरोजगार युवकाला तलाठी म्हणून नोकरीस लावून देतो, असे आमिष देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले.

नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांनी गंडविले
गुन्हा दाखल : न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
यवतमाळ : एका बेरोजगार युवकाला तलाठी म्हणून नोकरीस लावून देतो, असे आमिष देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मात्र अनेक दिवस लोटूनही नोकरीबाबत संबंधित व्यक्तीकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या युवकाने जिल्हा न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशावरून संबंधित आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी उमेश हिरामन राठोड (२८) रा. अडगाव याने नोकरीचे आमिष देऊन तुषार सुरेशराव अंतुरकर याच्याकडून चार लाख रुपये घेतले. तुषारला नोकरी लागण्यासाठी चार लाख रुपये द्यावे लागेल, असे आरोपीने सांगितले.
तलाठी पदभरती प्रक्रियेतून हे सेटींग लावणार असल्याची बतावणी आरोपीने केली. नोकरीच्या आमिषाने तुषारनेही घरातील सोने-नाणे मोडून रोख रक्कम उमेशकडे दिली. त्यानंतर नोकरीचे नियुक्ती पत्र मिळण्यासाठी वारंवार विचारणा केली. परंतु उमेश प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेत होता.
शेवटी पैसा गेला आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तुषारने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने संबंधित आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यावरून वडगाव रोड पोलिसांनी आरोपी उमेश हिरामन राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. (कार्यालय प्रतिनिधी)