चार निरागस जीव शाळेऐवजी देवाघरी गेले

By Admin | Updated: February 19, 2016 02:41 IST2016-02-19T02:41:34+5:302016-02-19T02:41:34+5:30

मुलांनी शाळेची तयारी केली, आईने टिफिन बॉक्स, वॉटरबॅग भरून दिली. आईने मुलांना अन् मुलांनी आईला ‘बाय’ केला.

Four innocent people went to Godghari instead of school | चार निरागस जीव शाळेऐवजी देवाघरी गेले

चार निरागस जीव शाळेऐवजी देवाघरी गेले

वणी : मुलांनी शाळेची तयारी केली, आईने टिफिन बॉक्स, वॉटरबॅग भरून दिली. आईने मुलांना अन् मुलांनी आईला ‘बाय’ केला. विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेले वाहन नजरेआड होऊन काहीच मिनिटे झाली अन् एक भयावह वार्ता साऱ्या वणी शहरात वाऱ्यासारखी पसरली. अपघात झाला अन् पाहता-पाहता चार निरागस जीव शाळेऐवजी देवाघरी गेले... कायमचे! आईच्या काळजाचे हे तुकडे चिरडणारा ट्रक होता कोळशाचा... काळ बनून आलेला!
गुरूवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने चार विद्यार्थ्यांचा बळी घेतला. चिमुकल्यांचा बळी गेल्याने वणीच नव्हेतर अवघा जिल्हा गहिवरला. अपघात होताच सोशल मीडियावरून ही कुवार्ता काही क्षणातच जिल्हाभर पसरली. प्रत्येक पालक मुलांना शाळेत पाठवून निर्धास्त झालेला असतानाच ही वार्ता मोबाईलवर धडकली. त्यामुळे यवतमाळ, पुसद, नेर, घाटंजी, पांढरकवडा, आर्णीसारख्या प्रत्येक गावातील पालकांच्या काळजात चर्र झाले. अशा बेफाम वाहतुकीने कुणाच्याही मुलाचा बळी जाणे शक्य आहे, या कल्पनेने अपघाताचे ‘मॅसेज’ भराभर फारवर्ड होत होते.
अपघाताची वार्ता मॅक्रून स्टुडंट अ‍ॅकेडमी या शाळेत पोहोचताच शाळेत याआधी पोहोचलेले विद्यार्थी प्रचंड घाबरून गेले होते. प्राचार्यांनी शाळेला सुटी जाहीर करून मृत विद्यार्थ्यांप्रती शोक व्यक्त केला. आपले सवंगडी गेल्याच्या वार्तेने शाळेतील विद्यार्थी हादरले होते. मात्र नेमका आपला कोणता सवंगडी अपघातात मृत्यू पावला, याचा ठावठिकाणा चिमुकल्या विद्यार्थ्यांना लागत नसल्याने प्रत्येकजण आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांची विचारपूस करीत होता. तर घरी अपघाताची नेमकी माहिती मिळत नसल्याने सर्वच पालक गोंधळून गेले होते. महिलांनी तर प्रचंड धास्ती घेत रूग्णालयाकडे मिळेल त्या वाहनाने धाव घेतली होती. ग्रामीण रूग्णालय परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरण होते. बसस्थानक ते ग्रामीण रूग्णालयाचा मार्ग गर्दीने गजबजलेला होता. वाहन समोर काढण्यासही जागा मिळत नव्हती. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मुकुटबन, शिरपूर, मारेगाव येथील पोलीस पथकाला पाचारण करावे लागले होते. अपघाताची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सुचिता पाटेकर आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) चिंतामण वंजारी यांनी वणीकडे धाव घेतली. घटनास्थळासह मृत विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. (कार्यालय प्रतिनिधी)

बहीण गेली, भाऊ वाचला
४भाऊ-बहीण एकाच शाळेत असल्याने ते एकाच वाहनात निघाले होते. या अपघातात श्रद्धा प्रदीप हुलके ही चिमुकली ठार झाली. त्याच वाहनात तिचा छोटा भाऊ श्रेयस प्रदीप हुलकेही होता. तो गंभीर जखमी झाला. मात्र अद्याप त्याला बहीण गेल्याचे माहीत नाही. हुलके कुटुंबीय मुळचे आंध्रप्रदेशातील दहेगाव (बेला) येथील रहिवासी आहे. श्रद्धाचा मृतदेह घेऊन कुटुंबीय मूळगावी गेले. श्रेयस मात्र येथील खासगी रूग्णालयात दाखल होता. आता त्याला वणीतील एका नातेवाईकाकडे नेण्यात आले आहे. अपघातात देऊळकर कुटुंबातील गौरव हिरामण देऊळकर हा चिमुकला ठार झाला. त्याचा चुलत भाऊ निशांत यादव देऊळकर हा जखमी झाला. मात्र त्यालाही आपला चुलत भाऊ गेल्याचे कळले नाही. सुदैवाने या अपघातातून तो बचावला.

Web Title: Four innocent people went to Godghari instead of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.