बिबट्याच्या हल्ल्यात चार जनावरे ठार
By Admin | Updated: November 8, 2014 22:44 IST2014-11-08T22:44:03+5:302014-11-08T22:44:03+5:30
शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या चार वगारी बिबट्याने शुक्रवारी रात्री ठार मारल्या. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पिटाळून लावलेला बिबट घटनास्थळी वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये

बिबट्याच्या हल्ल्यात चार जनावरे ठार
सोनखास : शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या चार वगारी बिबट्याने शुक्रवारी रात्री ठार मारल्या. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पिटाळून लावलेला बिबट घटनास्थळी वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या प्रकारामुळे जामवाडी येथील नागरिकांनी रात्र जागून काढली.
दीपक कालोकार यांच्या मालकीच्या या वगारी आहेत. रात्री ८.३० च्या सुमारास त्यांचा गडी मोहन धराडे हा शेतात गेला असता त्याला चार वगारी मारलेल्या आढळून आल्या. शिवाय बिबट्याही त्याला दिसला. ही बाब त्याने कालोकार यांना येऊन सांगितली. लगेच गावकरी शेताकडे धावले, त्याहीवेळी बिबट तेथे होता. वारंवार पिटाळून लावल्यानंतर तो वगारीजवळ येत होता. रात्री ९.३० वाजतापर्यंत हा प्रकार चालला.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पी.एस. यादव, पी.एम. लांडगे, पी.सी. मेश्राम घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान पशुचिकित्सालयाचे डॉ.एच.पी. ढोले, डॉ.आर.बी. भटारकर यांनी वगारांची शवचिकित्सा केली. यानंतर या वगारी शेतातच पुरण्यात आल्या. सदर घटनेमुळे पशुधन पालकांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)