ग्रामसेविकेने लगावली माजी सरपंचाच्या कानशीलात

By Admin | Updated: August 1, 2014 00:27 IST2014-08-01T00:27:28+5:302014-08-01T00:27:28+5:30

जन्म तारखेच्या दाखल्यावरून वाद होवून ग्रामसेविकेने चक्क माजी सरपंचाच्या कानशीलात लगावली. ही घटना तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पश्चिम) येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

The former Sarpanch of the Gramsevike has engaged in the match | ग्रामसेविकेने लगावली माजी सरपंचाच्या कानशीलात

ग्रामसेविकेने लगावली माजी सरपंचाच्या कानशीलात

ब्राह्मणवाडाची घटना : सरपंच आणि ग्रामसेवक संघटना पोलीस ठाण्यावर धडकले
नेर : जन्म तारखेच्या दाखल्यावरून वाद होवून ग्रामसेविकेने चक्क माजी सरपंचाच्या कानशीलात लगावली. ही घटना तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पश्चिम) येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सरपंच संघटना आणि ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पोलीस ठाण्यावर धडकले. पोलीस ठाण्यात बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, नेर पोलीस ठाण्यात दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पश्चिम) येथे आज ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. मात्र या सभेला ग्रामसेविका उशिरा पोहोचल्या. त्यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य निघून गेले होते. दरम्यान, माजी सरपंच दिलीप खडसे जन्म तारखेच्या दाखल्यासाठी तेथे आले. त्यावरून ग्रामसेविका आणि माजी सरपंचात वाद सुरू झाला. हा वाद एवढा पोहोचला की ग्रामसेविकेने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच दिलीप खडसे यांच्या कानशीलात लगावली. यानंतर या दोघात चांगलीच झटापट झाली.
या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामपंचायत कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर दोघेही नेर पोलीस ठाण्यात पोहोचले. तोपर्यंत ग्रामसेवक संघटना आणि सरपंच संघटनेचे पदाधिकारी नेर पोलीस ठाण्यात पोहोचले. याठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान दिलीप खडसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामसेविकेविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(१)(१०), ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर ग्रामसेविकेच्या तक्रारीवरून माजी सरपंच खडसे यांच्याविरोधात ३५३, २९४, ३५४, ३३२, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. अधिक तपास ठाणेदार गणेश भावसार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंपीकर, हरिचंद्र कार करीत आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून आता सरपंच संघटना आणि ग्रामसेवक संघटना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The former Sarpanch of the Gramsevike has engaged in the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.