उमर्डा नर्सरीत साकारतेय ‘फॉरेस्ट लायब्ररी’
By Admin | Updated: September 13, 2016 02:20 IST2016-09-13T02:20:31+5:302016-09-13T02:20:31+5:30
शहरापासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उमर्डा नर्सरीचा कायापालट केला जात आहे.

उमर्डा नर्सरीत साकारतेय ‘फॉरेस्ट लायब्ररी’
यवतमाळ : शहरापासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उमर्डा नर्सरीचा कायापालट केला जात आहे. कधीकाळी चंदन बन म्हणून परिचित असलेल्या या नर्सरी परिसरात तस्करांनी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा अनेक वर्ष दुर्लक्षित होता. आता येथे फॉरेस्ट लायब्ररी साकारली असून वन्यप्रेमींसाठी ज्ञानाचे वेगळे भंडार उघडले जाणार आहे. शिवाय येथे वनौषधी उद्यान तयार केले जात आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वनसंपदेसंदर्भातील आपली जिज्ञासा शमविण्यासाठी उमर्डा नर्सरीत अद्यावत अशी फॉरेस्ट लायब्ररी तयार केली जाणार आहे. या ठिकाणी वन्यजीवांसंदर्भातील इत्थंभूत माहिती, वनस्पतींची माहिती, वनौषधींची माहिती दिली जाणार आहे. यासाठी डिजीटल हरबेरीयम लावण्यात येणार आहे. यावर वन्यजीवासह वनस्पतींची उपयोगिता मांडणारी माहिती राहणार आहे. वाईल्ड लाईफवर तयार केलेली डाक्युमेंट्री येथे आलेल्या पर्यटकांना पहावयास मिळणार आहे.
उमर्डा नर्सरी परिसरात विविध प्रजातींच्या पक्षांचे साईटींग नियमित होते. पक्षी प्रेमींसाठी येथे निरीक्षणाला मोठा वाव मिळणार आहे. सध्या मोर, पॅरॉकिट, किंगफिशर यासह काही विदेशी पक्षीही येथे ठराविक कालावधीत पहावयास मिळतात. २०० हेक्टर परिसरातील वनौषधी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करण्यात आले आहे. नेचर कॅम्पच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना अभ्यासासाठी हक्काचे परिपूर्ण असे दालन मिळणार आहे. शिवाय शहरी जीवनात आलेला क्षीण घालविण्यासाठी उमर्डा नर्सरीत विकएन्ड साजरा करता येणार आहे. अशा परिपूर्ण पद्धतीने एक पर्यटन स्थळ म्हणून उमर्डा नर्सरीत फेरबदल केले जात आहे. यवतमाळकरांसाठी उमर्डा नर्सरी ही खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक गिरजा देसाई यांनी सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे दीड कोटींची मागणी केली आहे. आराखडा तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)