वन विभागातील सर्वेक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात ! शेत सर्वेक्षणासाठी शेतकऱ्याला मागितली लाच

By सुरेंद्र राऊत | Updated: September 10, 2025 17:52 IST2025-09-10T17:51:26+5:302025-09-10T17:52:30+5:30

कार्यालयात स्वीकारली लाच : सागवान ताेडण्यासाठी शेती सर्वेक्षण करण्याकरिता शेतकऱ्याला केली पैशाची मागणी

Forest department surveyor caught in ACB's trap! Asked for bribe from farmer for field survey | वन विभागातील सर्वेक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात ! शेत सर्वेक्षणासाठी शेतकऱ्याला मागितली लाच

Forest department surveyor caught in ACB's trap! Asked for bribe from farmer for field survey

यवतमाळ : वन विभागातील लाचखाेरीचे प्रमाण वाढले असून, थेट कार्यालयातच लाच स्वीकारली जात आहे. बुधवारी यवतमाळ एसीबीच्या पथकाने सापळा रचून १५ हजारांची राेख स्वीकारताना वन सर्वेक्षक यांना वन भवन येथील उपवनसंरक्षक कार्यालयात रंगेहाथ पकडले. त्यांनी सागवान ताेडण्यासाठी शेती सर्वेक्षण करण्याकरिता शेतकऱ्याला पैशाची मागणी केली हाेती.

सुमित शंकरराव अक्कलवार (वय ३२) असे लाचखाेर वन सर्वेक्षकाचे नाव आहे. त्याने जाेडमाेहा (ता. कळंब) येथील शेतकऱ्याला सागवान वृक्षतोडीकरिता शेताचे सर्वेक्षण करून सीमांकन अहवाल देण्याकरिता तीन शेताचे प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे एकूण ३० हजारांची मागणी केली हाेती. याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने यवतमाळ एसबी कार्यालयात दिली. त्यावरून उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या पथकाने मंगळवार ९ सप्टेंबर राेजी पंचासमक्ष पडताळणी केली. या दरम्यान वन सर्वेक्षक याने तक्रारदार शेतकऱ्याकडून तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. त्याअनुषंगाने बुधवारी १० सप्टेंबर राेजी सकाळी ११:३० वाजता एसीबी पथकाने सापळा लावला. या पथकासमक्षच सुमित अक्कलवार याने १५ हजारांची लाच घेतली. पंचासमक्ष लाच स्वीकारल्याने सुमित याला एसीबीने ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोलिस निरीक्षक मनोज ओरके, जमादार जयंता ब्राह्मणकर, अतुल मते, अब्दुल वसीम, शिपाई सचिन भोयर, राकेश सावसाकडे, इफ्राज काझी, चालक संजय कांबळे यांनी केली. या कारवाईमुळे वन भवन येथे एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Forest department surveyor caught in ACB's trap! Asked for bribe from farmer for field survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.