पुसद येथे प्रकल्पग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन
By Admin | Updated: May 2, 2015 01:58 IST2015-05-02T01:58:25+5:302015-05-02T01:58:25+5:30
तालुक्यातील इसापूर धरणामुळे १३ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र येथील ग्रामस्थांची समस्या अद्यापही कायम आहे.

पुसद येथे प्रकल्पग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन
पुसद : तालुक्यातील इसापूर धरणामुळे १३ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र येथील ग्रामस्थांची समस्या अद्यापही कायम आहे. शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या ग्रामस्थांनी महाराष्ट्र दिनापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
पैनगंगा नदीवर ३५ वर्षांपूर्वी इसापूर धरण साकारण्यात आले. त्यावेळी मोप, शिवणी, रोहकर, जाम नाईक (१, २), जवळा, नाणंद (१, २, ३) ही गावे विस्थापित झाली. ३५ वर्षानंतरही येथील ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांच्या एकही सोयी-सुविधा मिळाली नाही. केवळ प्रशासनाकडून लेखी आश्वासने देण्यात आली. आठ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या १३ गावात एकही पांदण रस्ता करण्यात आला नाही.
धरणग्रस्त हे प्रमाणपत्र असलेल्या सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय सेवेत सामावून घेतले नाही. आठ हजार प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील केवळ २५ जणांना शासकीय सेवेत घेतले. होरकड येथील प्रकाश निवृत्ती कांबळे (३९) या युवकाने २००५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यानंतरही १० वर्षे लोटून प्रकाशला नोकरी मिळाली नाही. आज त्याच्याकडे स्वत:चे घर नाही. अशीच अवस्था विलास रामा खंडारे याची आहे.
शिवणी या गावात तीन वर्षांपासून ग्रामसभाच नाही. गावात ग्रामसेवक कधीच आला नाही, असे पंडीतराव घुमकर यांनी सांगितले. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. २८ (अ)चा निधी अद्यापही उपलब्ध झालेला नाही. गावात सातवीपर्यंत शाळा नाही, स्मशानभूमी नाही. रोजगार नसल्याने युवकांत निराशा पसरली आहे, असे माधवराव कांबळे, विलास खंदारे, शिवाजी मस्के, कादूराम गुळवे, दत्तराव हाके, अंकुश शिंदे, विजय बोडखे, दीपक सावंत यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचे नेतृत्व अॅड़ सचिन नाईक करत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या एक महिन्यात पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असे सांगण्यात आले. पुसदच्या गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
यामध्ये मारोतराव जराड, माधव मस्के, पार्वतीबाई वाळले, शिला कांबळे, आनंद मरकड, गजानन बुरकुडे, रमेश खरात, डॉ. लक्ष्मण मस्के, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पग्रस्त कमिटीचे अध्यक्ष डॉ.बी.जी. नाईक, अभय गडम, ज्ञानेश्वर तडसे, अॅड़ चंद्रशेखर शिंदे, अरूण शिरसाठ, प्रभाकर थोरात आदी सहभागी झाले आहेत.
(तालुका प्रतिनिधी)