अन्न सुरक्षा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: April 21, 2015 01:36 IST2015-04-21T01:36:27+5:302015-04-21T01:36:27+5:30
हॉटेल आणि बार मालकांवर संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नऊ जणांची वार्षिक हप्त्याची ५१ हजार रुपये लाच स्वीकारताना

अन्न सुरक्षा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
यवतमाळ : हॉटेल आणि बार मालकांवर संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नऊ जणांची वार्षिक हप्त्याची ५१ हजार रुपये लाच स्वीकारताना येथील अन्न व औषधी प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. ही कारवाई येथील शिवाजी नगरातील अन्न व औषधी प्रशासन कार्यालयासमोरच सोमवारी करण्यात आली.
प्रभाकर निवृत्ती काळे (४२) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रभाकर काळे याने आर्णी येथील बार आणि हॉटेलवरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांची मागणी केली होती. खाद्य तेलाचे व मिरचीचे नमुने पास करून देतो, असे सांगितले होते. यासाठी आर्णी येथील बार मालक विजय जयस्वाल यांना आठ जणांकडून प्रत्येकी सहा हजार रुपये आणि जयस्वाल यांचे तीन हजार असे ५१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मागणी पूर्ण न केल्यास सर्व बार व हॉटेल मालकांना त्रास होईल, असा इशाराही दिला होता. या प्रकाराची माहिती विजय जयस्वाल यांनी यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिली. त्यावरून सोमवारी सापळा रचण्यात आला. शिवाजीनगर स्थित अन्न व औषधी प्रशासन सहायक आयुक्त कार्यालयासमोर पैसे घेण्यासाठी प्रभाकर काळे आला. त्यावेळी विजय जयस्वाल यांनी इशारा करताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर आदींनी केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. (नगर प्रतिनिधी)